संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आलिया भट्टच्या अभिनयाचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होताना दिसत आहे. ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. पण या चित्रपटात आलियानं माफिया क्वीन गंगूबाई काठियावाडी यांची भूमिका साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलियानं माफिया क्वीन गंगूबाई यांची भूमिका साकारली आहे. काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार ही भूमिका साकारण्यासाठी आलिया भट्टनं मुंबईतील रेड लाइट भाग कमाठीपुरामधील खऱ्या सेक्स वर्करसोबत काही वेळ व्यतित केला. त्याचं राहण- बोलणं, वागणं या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आलियानं त्यांच्यासोबत काही काळ घालवला. अर्थात याचा परिणाम चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला. आलियानं या भूमिकेत अक्षरशः जीव ओतला आहे. गंगूबाई काठियावाडी यांची भूमिका तिनं दमदारपणे साकारली आहे.

दरम्यान मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्पे चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाचं प्रदर्शन करोनामुळे रखडलं होतं. पण आता हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सीमा पहवा, विजय राज आणि हुमा कुरैशी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt spend time with real sex worker for her role in gangubai kathiawadi mrj