दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर मागच्या वर्षी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
भन्साळी प्रॉडक्शनच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाचं प्रदर्शन करोनामुळे रखडलं होतं. पण आता हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२१ ला प्रदर्शित होणार होता मात्र करोनाच्या वाढत्या संकटामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.
दरम्यान चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर्स समोर आल्यानंतर या चित्रपटावरून बरेच वाद झाले होते. प्रदर्शनावर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली होती. पण आता सर्व समस्यांचा सामना करून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आलिया भट्टच्या अभिनयाचं बरंच कौतुक झालं होतं. त्यामुळे आता चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात कितपत यशस्वी ठरतो याची उत्सुकता आहे.