बॉलीवूडमधील करण जोहर, इम्तियाज अली अशा तगड्या दिग्दर्शकांबरोबर काम केल्यानंतर अभिनेत्री आलिया भटने आता अॅक्शनपटांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रोहित शेट्टीच्या चित्रपटांत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर आलियाने आतापर्यंत इम्तियाज अलीच्या ‘हायवे’ आणि अभिषेक वर्मनच्या ‘टु स्टेटस’ या चित्रपटांच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये बऱ्यापैकी बस्तान बसविले आहे. मात्र, मला आता केवळ रोमँटिक भूमिकांमध्ये अडकून पडायचे नाही, असे आलियाने नुकतेच स्पष्ट केले. मला एकाच ठिकाणी थांबून किंवा एकाच चौकटीत काम करायचे नसल्याचेसुद्धा तिने यावेळी सांगितले. मात्र, याचा अर्थ मला व्यवसायिक चित्रपटांपासून फारकत घ्यायची आहे असा होत नाही हे सांगायलासुद्धा आलिया विसरली नाही. रोहित शेट्टीसारख्या दिग्दर्शकाबरोबर एखाद्या कॉमेडी अॅक्शनपटात काम करण्यासाठी मी तयार आहे. परंतु; चित्रपटातील माझी भूमिका चांगली असायला हवी, असे आलियाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Story img Loader