सध्या बॉलिवूडमध्ये दोनच गोष्टींच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. एकतर ‘संजू’ चित्रपटाच्या कमाईची आणि दुसरी चर्चा म्हणजे आलिया -रणबीरच्या नात्याविषयी. आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा नुकताच आलियाने केला आहे. त्यामुळे जगजाहीर झालेलं हे जोडपं एकमेकांना वेळ देताना दिसत आहे. विशेष म्हणजे आलिया केवळ रणबीरलाच वेळ देत नसून रणबीरच्या आईला अर्थात नीतू सिंग यांना देखील वेळ देत असल्याचं समोर आलं आहे.
सौंदर्य आणि उत्तम अभिनय कौशल्य यामुळे बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या नीतू सिंग-कपूर यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. त्यामुळे सध्या कपूर कुटुंबियांमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरु आहे. नीतू यांना बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी शुभेच्छा दिला असून ‘राझी’ फेम आलिया भटनेदेखील नीतू सिंग यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा यंदाचा वाढदिवस खास झाल्याचं सांगण्यात येत आहे.
आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नीतूसिंग यांना खास शुभेच्छा देत एक फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया,दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि नीतूसिंग दिसून येत आहे. या फोटोला साजेशी कॅप्शन देत आलियाने ‘हॅप्पी बर्थ डे @Neetu54’ असं म्हणतं शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाचं ही पोस्ट पाहून नीतू सिंग यांना नक्कीच आनंद झाला असेल यात शंका नाही. विशेष म्हणजे नीतू सिंगसाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये आलियादेखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.