जब वी मेट… शाहिद कपूर आणि करिना कपूर या दोघांच्या उत्तम अभिनयामुळे गाजलेला चित्रपट. आजही अनेक जण या चित्रपटाचे चाहते आहेत. या चित्रपटामध्ये करिना कपूरने गीत ही व्यक्तिरेखा साकारली होती. अनेकांनी करिना कपूरच्या या चित्रपटातील अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेल्या अभिनेत्रींपैकी कोणी जर गीतची व्यक्तिरेखा साकारू शकत असेल, तर ती आलिया भट असल्याचे मत शाहिद कपूरने मांडले आहे.
शाहिद कपूर आणि आलिया भट यांच्या अभिनयाने सजलेला शानदार हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचे सध्या देशभरात जोरदार प्रमोशन करण्यात येते आहे. प्रमोशनाच्या एका कार्यक्रमातच शाहिद कपूरने आलियाचे तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला, भविष्यात जर कोणी गीतची व्यक्तिरेखा साकारू शकेल. तर ती केवळ आलियाच असेल. आलियामध्ये गीत इतकाच उत्साह आहे आणि ती गीतसारखीच वाटते, असे त्याने सांगितले.
आलियाने मात्र शाहिदचे मत फेटाळले. ती म्हणाली, गीतची व्यक्तिरेखा भविष्यात कोणी साकारू शकेल, असे मला वाटत नाही. ती एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा होती. जब वी मेट आणि आमच्या शानदारमध्ये शाहिद कपूरशिवाय काहीही साम्य नाही, असेही ती म्हणाली.
विकास बहल यांच्या ‘शानदार’मध्ये आलियाने खूप बडबड्या आणि प्रेमळ तरूणीची भूमिका साकारली आहे.

Story img Loader