Alka Kubal : महिलांवर, मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांबाबत अलका कुबल यांना विचारलं असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एखादा बाप जर मुलींवर बलात्कार करणारा असेल तर मुलींनी त्याचा खून करायला हवा असं त्या म्हणाल्या आहेत. अलका कुबल या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्या जळगाव या ठिकाणी खानदेश करिअर महोत्सवासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
बलात्काराच्या घटनांबाबत काय म्हणाल्या अलका कुबल?
“आपण ना नुसता पोलिसांना दोष देतो. पण आजूबाजूचे लोकही जबाबदार आहे. बघितलं तर या घटना घरातून घडत असतात. कुठे कुणाचा काका असतो, चुलत भाऊ असतो, आतेभाऊ असतो. मागच्या महिन्यात एक बातमी पाहिली वडील चार मुलींवर बलात्कार करत होते. मला वाटलं चार मुलींनी अशा बापाचा खून करायला हवा होता. इतकी चिड येते. बलात्कारासाठी कडक शिक्षा व्हायला हव्या जशा सौदीला होतात तशा. कायदे कठोर हवेत. बलात्कार होताना कुणीही मदत पडत नाही. अनेकदा महिलाही मधे पडत नाहीत. मध्यंतरी बातमी पाहिली दोन मुलं धावत आली आणि त्यांनी ती घटना थांबवली. त्यांचं कौतुक वाटलं मला. जमाव आला तर बलात्कार करणाऱ्याची हिंमत होणार नाही.”
नालायक बाप असेल तर वेगळं काय करणार?-अलका कुबल
“जो बाप नालायक असू शकतो, जो आपल्या मुलींवर बलात्कार करतो आहे, त्या बापाला सोडायचं का? कायद्याची शिक्षा कठोर असली पाहिजे. चार वर्षे आत जाणार आणि बाहेर आल्यावर त्याचं तेच होणार. चार मुलींचा वापर करतो असा बाप असेल तर त्याला काय म्हणणार?” असं परखड मत अलका कुबल यांनी म्हटलं आहे.
आखाती देशांप्रमाणे कायदे हवेत-अलका कुबल
खानदेश करिअर महोत्सवासाठी अभिनेत्री अलका कुबल जळगावमध्ये उपस्थित होत्या. या महोत्सवासाठी अभिनेत्री अलका कुबल उपस्थित होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या की, महिलांवर अत्याचार रोखायचं असतील तर आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवे, त्यात एखादा बापच जर मुलीवर अत्याचार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करायला हवा, अशी उद्विग्न होत संतापजनक प्रतिक्रिया अभिनेत्री अलका कुबल यांनी जळगावमध्ये दिली आहे.
मोबाईलच्या अतिरेकामुळे मूलभूत संस्कार हरवत चालले आहेत-अलका कुबल
“लहान वयातच मोबाईलच्या अतिरेकामुळे मूलभूत संस्कार हरवत चालले आहेत. घरात मोठ्यांचे मार्गदर्शन आणि एकत्रित कुटुंबपद्धतीमुळे चांगले संस्कार रुजतात, असा आपला अनुभव आहे.” असं अलका कुबल यांनी सांगितलं आहे. स्वतःच्या करिअरमध्ये सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि योगदानामुळे आपल्याला यश मिळालं, हे त्यांनी खासपणे म्हटलं आहे.