रवींद्र पाथरे

अलीकडच्या काळात पाच हजारांचा प्रयोगटप्पा गाठणारी वा गाठू शकणारी केवळ दोन-तीन नाटकंच रसिकांना माहीत आहेत. त्यापैकी ‘वस्त्रहरण’ आणि ‘यदा कदाचित’ने हा टप्पा कधीच गाठला आहे. दुसरी नाटकं म्हणजे या टप्प्याच्या आसपास पोहोचलेली ‘सही रे सही’ आणि ‘ऑल दि बेस्ट’ ही दोन नाटकं. पैकी ‘ऑल दि बेस्ट’चे आतापर्यंत बारा भाषांमध्ये तब्बल साडेनऊ हजार प्रयोग झाले आहेत, तर मराठीत त्याचे साडेचार हजारच्या आसपास प्रयोग झाले आहेत. हा एक विक्रमच म्हणायला हवा. १९९३ मध्ये रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने अक्षरश: धूमाकूळ घातला. त्यावेळी या नाटकाचे तीन तीन संचांत प्रयोग होत होते; एवढी या नाटकाला प्रचंड मागणी होती. या नाटकावरून चित्रपट काढण्याचे हक्कही घेतले गेले होते असं म्हणतात. आता पुन्हा नव्याने हे नाटक लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम यांनी रंगमंचावर आणलं आहे. 

Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Ankita Walawalkar and Suraj Chavan meeting video has goes viral on social media
Video:…म्हणून अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणची घेतली उशीरा भेट, म्हणाली, “पॅडी दादा…”
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Suraj Chavan
गळ्यात हार घातला, पाया पडला, डोक्यावरून हात फिरवत सूरज चव्हाणने रूद्राप्रति ‘अशी’ केली कृतज्ञता व्यक्त; पाहा व्हिडीओ
Marathi Actress Shivani Sonar Share Special Post For mother on 50th birthday
“अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…

आय. एन. टी. स्पर्धेत प्रथम सादर झालेली ही एकांकिका तेव्हा नंबरात काहीशी मागासली होती. पण दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी महेश मांजरेकर आणि निर्माते मोहन वाघ यांना यावर उत्तम नाटक होऊ शकेल असं सांगून देवेंद्र पेम यांना या एकांकिकेचं पूर्ण लांबीचं नाटक करायला लावलं होतं. आणि पुढे या नाटकानं घडवलेला इतिहास सगळ्यांनाच ज्ञात आहे. या नाटकाच्या अनेक आवृत्त्याही नंतर निघाल्या. संजय नार्वेकर, भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संपदा जोगळेकर यांनी पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमीवर ‘ऑल दि बेस्ट’मधून अक्षरश: धूमशान घातलं. या नाटकानं जबरदस्त इतिहास घडवला. पुढे त्यांची रिप्लेसमेंट केलेल्या अन्य संचांतील  कलाकारांनाही या नाटकाने ओळख मिळवून दिली. त्यांचं करिअर मार्र्गी लावलं. असं हे नाटक पुनश्च एकदा नव्या नटसंचात रंगभूमीवर आलं आहे.

हेही वाचा >>> ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री झळकणार लोकप्रिय हिंदी मालिकेत, साकारणार प्रमुख भूमिका!

विजय (आंधळा), दिलीप (मुका) आणि चंद्रकांत ऊर्फ चॅंग (बहिरा) या तीन मित्रांची ही गोष्ट आहे. परस्परांच्या उणिवा झाकत हे तिघंही एकत्र राहत असतात. आणि एके दिवशी ते एका मुलीच्या (मोहिनी) प्रेमात पडतात. ती त्यांच्यातल्या हुन्नरला, त्यांच्या प्रगतीला आणि कर्तबगारीला प्रोत्साहन देते. पण त्या प्रत्येकाला वाटत असतं, की ती आपल्याला(च) मिळावी. सुरुवातीला ते तिघंही आपापलं व्यंग तिच्यापासून शक्य तितकं लपवून ठेवतात. नंतर दुसऱ्याला कमीपणा यावा म्हणून ते परस्परांचं व्यंग तिच्यासमोर उघड करतात. तरी त्याकडे दुर्लक्ष करून मोहिनी त्यांना प्रोत्साहन देते. (खरं तर त्यांची व्यंगं तिला सुरुवातीलाच कळलेली असतात.) पण तिला मिळवण्याच्या नादात ते बहकतात. शेवटी ती आपलं लग्न आधीच ठरलं आहे हे त्यांना सांगून टाकते. ते सारे निराश होतात. पण जेव्हा ती त्यांना सांगते की, ती ज्याच्यावर प्रेम करते तोही अपंग आहे, पण कर्तृत्ववान आहे, तेव्हा त्या सगळ्यांचे डोळे खाड्कन उघडतात.

तीन शारीर व्यंगपीडित तरुणांची ही गोष्ट साकारताना लेखक-दिग्दर्शकाला बरीच बौद्धिक आणि भाषिक तसंच नाटयात्म कसरत करावी लागली आहे. इम्प्रोव्हायझेशन तंत्रानं हे नाटक बसवलं गेलं आहे. एकाच्या व्यंगावरचा उतारा दुसरा असणं ही या नाटकाची खासीयत. तिचा अत्यंत हुशारीने वापर देवेंद्र पेम यांनी नाटक रचताना आणि बसवताना केला आहे. त्यासाठी तयारीचे कलाकार असणं गरजेचं होतं. त्यांच्याकरवी नाटकातील विनोदाच्या हमखास जागा काढणं हे दिग्दर्शकाचं जबरी कसब. यात बहिऱ्याला मुका अनेक गोष्टी शारीर भाषेद्वारे समजावून देतो. बहिरा मुक्याबरोबरच्या संवादात आंधळ्याचा दुवा होतो. आणि ते तिघंही एकत्र असताना एकमेकांशी संवाद साधताना जो गोंधळ-गडबड होते ती केवळ बघण्यासारखीच आहे. हे नाटक जसं प्रथमत: लेखक-दिग्दर्शकाचं आहे तसंच ते कसलेल्या कलाकारांचंदेखील आहे. त्यांच्या क्रिया- प्रतिक्रिया- प्रतिक्षिप्त क्रिया यांच्यातून हे नाटक फुलत, बहरत जातं. त्यातून यातल्या सूक्ष्म विनोदाच्या जागा अत्यंत नजाकतीनं काढल्या गेल्या आहेत.

यातले कलाकार विलक्षण हुकमी विनोदवीर आहेत. मयुरेश पेम यांनी मुक्या दिलीपची भूमिका अतिशय सखोलतेनं अंगी बाणवली आहे. त्यांचे हातवारे, हावभाव, तोंडातून निघणारे किंवा काढलेले आवाज यांतून त्याच्या साऱ्या भावभावना उत्कटपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. दिलीपचे हर्ष-खेद, राग-लोभ, हताशा, दु:ख तीव्रतेनं मयुरेश पेम यांनी हातवारे, देहबोलीे आणि हालचालींतून व्यक्त केलं आहे. मनमित पेम यांनी ‘हॅपी गो लकी’ बहिरा चॅंग अत्यंत सहजतेनं आणि उत्स्फूर्ततेनं साकारला आहे. अनेक विनोदाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म जागा त्यांनी स्वयंस्फूर्तीनं सजीव केल्या आहेत. त्यांचा रंगमंचीय वावरही धमाल आणतो. विकास पाटील यांचा आंधळा, पण स्मार्ट विजय लोभसवाणा. घरातल्या वावरात वस्तूंची अदलाबदल झाली किंवा काही चुकलंमाकलं तर किंवा एखादी आपली कृती फसली तर लगेचच स्वत:ला सावरून घेण्याचं त्यांचं तंत्र नाटक हलतं ठेवतं. रिचा अग्निहोत्री यांनी मोहिनीचं प्रोत्साहक, प्रसन्न व्यक्तिमत्त्व छान वठवलंय. त्यांचा वावरही सहज वाटतो.

प्रदीप पाटील (नेपथ्य), शीतल तळपदे (प्रकाशयोजना), वेदांत जोग (संगीत), उल्लेश खंदारे (रंगभूषा) आणि चैताली डोंगरे (वेशभूषा) या सगळ्यांनी आपापली कामगिरी चोख बजावली आहे. पुन:प्रत्ययाचा आनंद देणारं ‘ऑल दि बेस्ट’ प्रेक्षणीय आहे यात शंकाच नाही.