‘बडे दिनो में खुशी का दिन आया’ अशी या संपलेल्या वर्षभर अवस्था रंगली. फरक इतकाच की, हिंदी चित्रपटसृष्टीत पूर्वप्रसिद्धी-पाटर्य़ा-प्रमोशन-कुचाळक्या यांची ‘मिली भगत’ जोरशोरसे रंगात असतानाच ‘गल्ला पेटी’वरही धमाल कायम राहिली. मराठीत नेमका तेथे शुकशुकाट चिकटून राहिला. पाटर्य़ात मात्र ती कसर भरून निघाली.
‘चालीस चौरासी’ने वर्ष सुरू झाले, ‘अग्निपथ’च्या बेभान यशाने वेग पकडला. ‘कहानी’, ‘इश्कजादे’, ‘विकी डोनर’, ‘रावडी राठोड’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘कॉकटेल’, ‘एक था टायगर’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘जब तक है जान’, ‘सन ऑफ सरदार’, ‘बर्फी’, ‘दबंग २’, एवढय़ा चित्रपटांना कित्येकांनी पुन्हा पुन्हा पाहिले. ‘राझ ३’, ‘ओ माय गॉड’, ‘जिस्म २’, ‘बोलबच्चन’, ‘हाऊसफुल्ल २’ यांना बरेच चांगले यश मिळाले. ‘लाईफ ऑफ पाय’ गुणवत्तेवर यशस्वी ठरला. गेल्या बऱ्याच वर्षांत एकाच वर्षी इतके चित्रपट यशस्वी ठरले नव्हते. वाढते तिकीटदर व नवीन चित्रपटाचे उपग्रह वाहिनीवर अल्पावधीत दर्शन या आव्हानांवर मात करत इतके यश म्हणजे कमालच हो. ‘ब्लड मनी’, ‘जन्नत २’, ‘मक्खी’ यांच्याही यशाची पोस्टर झळकली, त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्ही ठरवा. ‘प्लेअर्स’, ‘एक मै और एक तू’, ‘तेरे नाल लव्ह हो गया’, ‘लंडन पॅरिस न्यूयॉर्क’, ‘एजण विनोद’, ‘डिपार्टमेंट’, ‘हीरॉईन’, ‘जोकर’, ‘फेरारी की सवारी’, ‘अय्या’, ‘चक्रव्यूह’ या चित्रपटांनी निराश केले नसते तर यशाची टक्केवारी किती ‘झक्कास’ वाढली असती ना? अर्थात सगळेच चित्रपट पसंत कसे पडतील नि पसंत पडलेले चित्रपट दर्जेदार होते असे कुठे आहे? एवढं यश असूनही गुणवत्तेची चर्चा झालीच नाही (अपवाद लाइफ ऑफ पाय, विकी डोनरचा), उत्पन्नाचे आकडे दोनशे कोटींपर्यंत पोहचले, त्यात ‘खरे व्याज’ किती हे विश्लेषकांनीही विचारात घेऊ नये म्हणजे, ‘पडद्यापेक्षा पैसा झाला मोठा’ म्हणायचे. शंभर कोटी उत्पन्नातून निर्मिती खर्च, प्रमोशन-मार्केटिंग-आयकर, विविध कर वजा जाऊन प्रत्यक्ष दहा-बारा कोटींचा फायदा होतो. अशा ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’च्या गणिताचे कोडे सोडवण्यापेक्षा चित्रपटाच्या प्रसिद्धीला वेग व वलय देण्यासाठी ‘कोटीच्या कमाईची गोष्ट’ सोपी!
फार पूर्वी चित्रपटाच्या एकेका प्रसंगावर बरी-वाईट चर्चा होई, बहुधा त्या दर्जाचे चित्रपट इतिहासजमा झाले असावेत. ‘खान’दानी हीरोंना अजय-रणबीर-अक्षय-ऋतिकने टक्कर दिली तरी उत्तम अदाकारी नायिकांची ठरली, विद्या बालन (कहानी), श्रीदेवी (इंग्लिश-विंग्लिश), रानी मुखर्जी व करिना कपूर (तलाश), प्रियांका चोप्रा (बर्फी) यांच्यात बरीच पारितोषिके विभागतानाही प्रश्न बरेच पडतील. ‘पुनरागमन असावे’ श्रीदेवीसारखे (अर्थात इंग्लिश..) व ‘नसावे करिश्मा कपूरसारखे (डेंजरस इश्क) याचेही उत्तर मिळाले. कतरिनाने हिंदीत प्रगती केली नाही (त्यावाचून तिचे अडलेही नाही) पण नृत्यात ‘ताल’ पकडला. (‘अंग’ पकडले म्हणणे सभ्यतेत ‘बसत’ नाही. पण तिचे ‘चिकनी चमेली’ तसेच दिसते.)
गोळाबेरीज २०१२
‘बडे दिनो में खुशी का दिन आया’ अशी या संपलेल्या वर्षभर अवस्था रंगली. फरक इतकाच की, हिंदी चित्रपटसृष्टीत पूर्वप्रसिद्धी-पाटर्य़ा-प्रमोशन-कुचाळक्या यांची ‘मिली भगत’ जोरशोरसे रंगात असतानाच ‘गल्ला पेटी’वरही धमाल कायम राहिली.
First published on: 29-12-2012 at 02:56 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All total of