दिग्दर्शक पायल कपाडियाच्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाला न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलमध्ये (NYFCC) सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ही माहिती अमेरिकेतील पोर्टल ‘डेडलाइन’द्वारे शेअर करण्यात आली. या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांची महत्त्वाची भूमिका असून यावर्षी या चित्रपटाला प्रतिष्ठित अशा ‘कान्स’ (Cannes) फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ग्रँड प्रिक्स’ हा पुरस्कार मिळाला होता. ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाल्यानंतर या महोत्सवात या चित्रपटाची टीम जेव्हा रेड कारपेटवर आली तेव्हा टीमच कौतुक झाले होते.
‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ हा कान्स (Cannes) फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. आता या चित्रपटाला अमेरिकेत दोन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
हेही वाचा…जान्हवी कपूरचं टी-शर्ट पाहिलंत का? बॉयफ्रेंड शिखर पहारियाच्या नावाने वेधलं लक्ष, पाहा फोटो
गॉथम फिल्म अवॉर्ड्स २०२४ मध्येही चमक
विशेष म्हणजे, ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ला याआधी सोमवारी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या गॉथम फिल्म अवॉर्ड्स २०२४ मध्येही सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा (फिचर ट्रॉफी) सन्मान मिळाला होता. या श्रेणीत ‘ग्रीन बॉर्डर’, ‘हार्ड ट्रुथ्स’, ‘इन्साईड द यलो कुकून शेल’ आणि ‘व्हेर्मिग्लिओ’ हे चित्रपटदेखील नामांकनात होते. हा सोहळा न्यूयॉर्कमधील सिप्रियानी वॉल स्ट्रीट येथे पार पडला.
‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ ज्या संस्थेकडून नवा पुरस्कार मिळाला आहे ती न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल (NYFCC) ही एक प्रतिष्ठित संस्था असून तिचे सदस्य इंडीवायरचे डेव्हिड एलरिक (२०२४ उपाध्यक्ष), न्यूयॉर्क मॅगझिनचे अॅलिसन विलमोर आणि बिल्जे एबिरी, अटलांटिकचे डेव्हिड सिम्स (२०२४ अध्यक्ष) आणि टाइमच्या स्टेफनी झाकरेक आहेत.
‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’मध्ये कानू कुसरुती, दिव्या प्रभा आणि छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट फ्रान्समधील ‘पेटीट काओस’ आणि भारतातील ‘चॉक अँड चीज’ आणि ‘अनदर बर्थ’ यांची अधिकृत इंडो-फ्रेंच सहनिर्मिती आहे.