रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘गली बॉय’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर सगळ्यांनीच रणवीर आणि आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलं. पण, या दोघांबरोबरच या कहाणीच्या खऱ्या हिरोंचंही तितकंच कौतुक व्हायला हवं. हे हिरो म्हणजेच डिवाइन आणि नॅझी होय. मुंबईचे ‘गली बॉय’ म्हणून ते सोशल मीडियावर आजच्या पिढीला ठावूक आहेत. मुंबईच्या झोपडपट्टीत जन्मलेल्या या दोघांनीही रॅपच्या दुनियेत आपलं नाव कमावलं. आपल्या रॅपमधून त्यांनी कधी व्यथा मांडली तर कधी त्यात दबलेल्या समाजाचा आक्रोश समोर आणला म्हणूनच मुंबईतल्या अनेक तरुणांना हे ‘गली बॉय’ आपलेसे वाटू लागले.

विविआन फर्नांडिस म्हणजेच डिवाइन २०११ साली आलेल्या त्याच्या ‘ये मेरा बॉम्बे’ या रॅपमधून प्रसिद्धीस आला. मात्र त्याला आणि नॅझीला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘मेरे गली मै’ या रॅप साँगमधून. सुरूवातीचा काही काळी डिवाइननं इंग्लिशमधून रॅप लिहिले, गायले. मात्र इंग्लिश रॅप हे केवळ भारतातल्या एका विशिष्ट वर्गापूरता मर्यादीत असतात हे कळल्यावर डिवाइननं आपला मार्ग बदलला तो हिंदीत व्यक्त होऊ लागला. हातगाडी ओढणाऱ्यापासून ते रस्त्यावरच्या विक्रेत्यालादेखील रॅप आपलसं वाटावं ही त्याची मनापासून इच्छा होती आणि यात डिवाइन यशस्वी देखील झाला. तर नॅझी म्हणजेच नावेद शेख हा वयाच्या १३ व्या वर्षांपासून रॅप करू लागला. २२ व्या वर्षी त्यानं त्याचा आफताफ हा पहिला रॅप व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला होता. तेव्हापासून हे  दोघंही हिंदी रॅपर तरुणांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले.

मुंबईची झोपडपट्टी ते प्रसिद्धीचं  उत्तुंग शिखर हा सारा बदल सहज आणि एका फटक्यात घडला नव्हता. या दोघांनाही अनेक अडथळ्यांतून जावं लागलं होतं आणि हाच संघर्ष रणवीर- आलियाच्या ‘गली बॉय’मधून दाखवला आहे.

Story img Loader