सध्या इंटरनेटवर ‘कच्चा बादाम’ हे बंगाली गाणे धुमाकूळ घालत आहे. इंस्टाग्राम उघडताच आपल्याला याचा प्रत्यय नक्कीच येईल. या गाण्यावर अनेक रील्स बनत असून सेलिब्रिटीजनाही या गाण्याने भुरळ घातली आहे. इंस्टाग्रामपासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक लोक या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ पोस्ट करत आहेत. दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या मुलीने देखील या गाण्यावर डान्स केला आहे. तिचा हा क्यूट डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.
अल्लू अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची ५ वर्षांची मुलगी अल्लू अरहा ‘कच्चा बादाम’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘माझा छोटा बादाम अरहा’ असे म्हटले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जवळपास ४.८ मिलियन लोकांनी पाहिला आहे. अरहाचा क्यूट डान्स पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा : काजल अग्रवालच्या ‘त्या’ पोस्टला समांथाने दिला पाठिंबा, कमेंट करत म्हणाली…
‘कच्चा बादाम’ हे गाणं गाणारा व्यक्ती कोणताही प्रख्यात गायक नसून रस्त्यावर शेंगदाणे विकणारा सामान्य माणूस आहे. यांचं नाव भुबन बड्याकर असे आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूमी जिल्ह्यात भुबन हातगाडी घेऊन ठिक-ठिकाणी जाऊन शेंगदाणे विकतात. त्याचवेळी कोणीतरी, भुबन यांचा अनोख्या शैलीत गातानाचा व्हिडीओ शूट केला. इंटरनेटवर हा व्हिडीओ अपलोड होताच हे गाणे प्रचंड व्हायरल झाले. यानंतर लोकांनी या गाण्यावर डान्स व्हिडिओ बनवून भुबनला रातोरात प्रसिद्ध केले. त्यांचे या गाण्याने आयुष्यच बदलून टाकले.