Allu Arjun Arrested : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. ‘पुष्पा २ : द रुल’च्या प्रीमियर शोदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली होती. ४ डिसेंबरला सायंकाळी ‘पुष्पा २’ चा प्रीमियर सोहळा पार पडला होता. हैदराबादमधील संध्या थिएटरबाहेर या प्रीमियर शोसाठी ‘पुष्पा’च्या हजारो चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. मात्र, यादरम्यान चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याशिवाय या महिलेच्या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

प्रीमियर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैद्राबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला त्याच्या ज्युबली हिल्सच्या राहत्या घरातून अटक केली आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, अभिनेत्याची तेलंगणा हायकोर्टात धाव

अल्लू अर्जुनला अटक झाल्याचं वृत्त समोर येता अनेक तेलुगू कलाकार त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. तेलुगू स्क्राइबने दिलेल्या माहितीनुसार, मेगास्टार चिरंजीवी व त्यांची पत्नी सुरेखा या दोघांनी अटकेच्या वृत्तानंतर अल्लू अर्जुनच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. चिरंजीवी यांनी या घटनेबद्दल माहिती मिळताच आपल्या चित्रपटाचं शूटिंग त्वरीत थांबवून चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनच्या दिशेने धाव घेतली होती. मात्र, पोलिसांनी चिरंजीवी यांना पोलिस ठाण्यात न येण्याची विनंती केली. त्यामुळेच ते आपल्या पत्नीसह अल्लू अर्जुनच्या राहत्या घरी पोहोचले आहेत.

IANS ने ‘एक्स’वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चिरंजीवी अल्लू अर्जुनच्या घरी पत्नीसह दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, चित्रपट निर्माता दिल राजू पोलिस स्टेशनच्या बाहेर पोहोचल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : Video: पोलिसांनी अल्लू अर्जुनला नेलं वैद्यकीय तपासणीसाठी, रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर

दरम्यान, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि संध्या थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०५ आणि ११८(१) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. गर्दीचं व्यवस्थापन न केल्यामुळे ही चेंगराचेंगरी होऊन परिसरात गोंधळ उडाला. या अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी अल्लू अर्जुननं तेलंगणा उच्च न्यायालयात अपीलही केलं होतं. पण अद्याप त्याला या प्रकरणात कोणताही दिलासा मिळालेला नाही.

Story img Loader