Allu Arjun Arrested : ‘पुष्पा’स्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हैद्राबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला त्याच्या ज्युबली हिल्सच्या राहत्या घरातून शुक्रवारी सकाळी अटक केली. ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्लू अर्जुनला त्याच्या राहत्या घरातून कडेकोट बंदोबस्तात ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर विविध क्षेत्रातून यासंदर्भात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अल्लू अर्जुनच्या अटकेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : Allu Arjun arrest big update : अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणी मोठी घडामोड; मृत महिलेच्या पतीनं तक्रार मागे घेण्याची दर्शविली तयारी

अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, “मी या प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप करणार नाही. चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे त्यामुळे कायदा आपलं काम करेल. कायद्यापुढे सर्व समान आहेत.”

४ डिसेंबरच्या रात्री हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’च्या प्रीमियर शोदरम्यान चेंगराचेंगरी होऊन एका महिलेला आपला जीव गमवावा लागला तर, तिच्या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि संध्या थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०५ आणि ११८(१) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

हेही वाचा : अल्लू अर्जुनच्या अटकेबद्दल बॉलीवूडमधून पहिली प्रतिक्रिया, अभिनेता म्हणाला, “घडलेली घटना दुर्दैवी, पण त्याचा दोष…”

दरम्यान, आता या घटनेत ज्या महिलेचा मृत्यू झालाय तिच्या पतीने माध्यमांशी संवाद साधताना ‘अल्लू अर्जुनविरोधातील तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे’ असं सांगितलं आहे. तसेच तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनचा जामिन मंजूर केला आहे.

अल्लू अर्जुनला अटक झाल्याचं वृत्त समोर येता अनेक तेलुगू कलाकार त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. तेलुगु स्क्राइबने दिलेल्या माहितीनुसार, मेगास्टार चिरंजीवी व त्यांची पत्नी सुरेखा या दोघांनी अटकेच्या वृत्तानंतर अल्लू अर्जुनच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. चिरंजीवी यांनी या घटनेबद्दल माहिती मिळताच आपल्या चित्रपटाचं शूटिंग त्वरीत थांबवून चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनच्या दिशेने धाव घेतली होती. मात्र, पोलिसांनी चिरंजीवी यांना पोलिस ठाण्यात न येण्याची विनंती केली. त्यामुळेच ते आपल्या पत्नीसह अल्लू अर्जुनच्या राहत्या घरी पोहोचले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun arrested cm revanth reddy reaction says wont interfere in investigation sva 00