Allu Arjun House Attack : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ४ डिसेंबर रोजी त्याच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या प्रीमिअर दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेमध्ये एका महिलेचा जागीचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा जखमी झाला होता. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या काही लोकांनी आता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला केला. रविवारी (२२ डिसेंबर रोजी) उस्मानिया विद्यापीठातील आठ जणांनी अल्लूच्या, हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरात असलेल्या घरावर हल्ला करून तोडफोड केली. या घटनेनंतर काही वेळाने अल्लू आपली पत्नी आणि मुलांसह घर सोडून बाहेर पडला. या घटनेत सहभागी असलेल्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी अल्लू अर्जुन घरी नव्हता. त्या हल्ल्यानंतर काही वेळाने तो, त्याची पत्नी स्नेहा रेड्डी हे दोघेजण मुलांसह (अल्लू अरहा आणि अल्लू अयान) घरातून बाहेर पडताना दिसले. या घटनेनंतर अल्लूचे वडील अल्लू अरविंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अल्लू अर्जुनच्या वडिलांची प्रतिक्रिया
माध्यमांशी बोलताना अरविंद म्हणाले, “आज आमच्या घरी जे घडलं ते सर्वांनी पाहिलं आहे. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची ही योग्य वेळ नाही. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माझ्या घराजवळ कोणीही गोंधळ घालू नये, यासाठी पोलीस तैनात आहेत. अशा घटनांना कोणीही प्रोत्साहन देऊ नये. ही संयम ठेवण्याची वेळ आहे. कायदा हे प्रकरण मार्गी लावेल.”
Allu Arjun House Attack : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घरात घुसून तोडफोड; आठ जण ताब्यात
४ डिसेंबर रोजी आयकॉनिक संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या रेवती (वय ३५ वर्षे) नावाच्या महिलेच्या कुटुंबासाठी हल्लेखोरांनी एक कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. याच घटनेत रेवतीचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेज जखमी झाला होता. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेवेळी अल्लू अर्जुन तिथे उपस्थित होता. या प्रकरणी १३ डिसेंबर रोजी पोलिसांनी अभिनेत्याला अटकही केली होती. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती.
या घटनेबद्दल मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी आणि पोलिसांनी अल्लू अर्जुनवर गंभीर आरोप केले. मात्र, त्याच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा रेड्डी यांनी निषेध केला आहे. “चित्रपट सेलिब्रिटींच्या घरांवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. मी राज्याचे डीजीपी आणि शहर पोलीस आयुक्तांना कायदा व सुव्यवस्थेबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश देत आहे. याबाबत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. संध्या थिएटरच्या घटनेत सहभागी नसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया देऊ नये, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी,” अशी पोस्ट रेड्डी यांनी एक्सवर (ट्विटर) केली आहे.