काही दिवसांपूर्वी अभिनेता अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट ‘अला वैकुंठपुरमलू’ हिंदी भाषेत प्रदर्शित होणार असं बोललं जात होतं. पण आता या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन प्रदर्शित होणार नसल्याची माहिती मिळत आहे. ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनला मिळालेला प्रतिसाद पाहता अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरमलू’ हा चित्रपटही हिंदी भाषेत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित होणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमलू’चा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘शहजादा’ असं असून या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे जर आता ‘अला वैकुंठपुरमलू’ हिंदी भाषेत रिलीज झाला तर त्याचा परिणाम कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’वर होईल. चित्रपटाचं कलेक्शन कमी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे निर्मात्यांनी आता ‘अला वैकुंठपुरमलू’ हिंदी भाषेत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला ‘अला वैकुंठपुरमलू’ हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. दोन वर्षांपूर्वी तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटनं १५० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यावेळी या चित्रपटाची बरीच चर्चा देखील झाली होती. ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता अल्लू अर्जुनचा हा चित्रपट देखील हिंदी भाषेत डब करून रिलीज केला जाणार होता.

दरम्यान कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या ‘शहजादा’ या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कार्तिक किती यशस्वी ठरतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण ‘अला वैकुंठपुरमलू’चं हिंदी भाषेतील प्रदर्शन रद्द झाल्यानं चाहत्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun film ala vaikunthapurramuloo will not release in hindi know the reason mrj