अभिनेता अल्लू अर्जुनला ‘पुष्पा २’च्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४) पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली होती. त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अभिनेत्याने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली होती. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याला कोर्टाने चार आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र अल्लू अर्जुनला एक रात्र चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात घालवावी लागली. आज सकाळी त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर अल्लू अर्जुनने अटक प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज तुरुंगात सुटल्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने न्यायव्यवस्थेवर विश्वास असून तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन म्हणाला, “प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मला माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. काळजी करण्यासारखं काहीही नाही. मी ठीक आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी तपासात पूर्ण सहकार्य करेन. घडलेली घटना खूप दुर्दैवी होती आणि मी पुन्हा एकदा त्याबद्दल शोक व्यक्त करतो. जे घडलं त्याबद्दल आम्हालाही वाईट वाटत आहे.”
हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला तरी जीव गमवावा लागत असेल तर…”
हा एक अपघात होता- अल्लू अर्जुन
पुढे तो म्हणाला, “आम्ही चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो आणि तिथे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. जे घडलं त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटत आहे. जे घडलं ते माझ्या नियंत्रणात नव्हतं. मागील २० वर्षांपासून मी माझे चित्रपट बघायला जातो. पण आजपर्यंत असं काहीच घडलं नाही. हा फक्त एक अपघात होता. मी कायम पीडितेच्या कुटुंबाच्या मदतीसाठी हजर असेन. मी सर्व चाहत्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो.”
अल्लू अर्जुनचा व्हिडीओ –
पुष्पा २’ चित्रपटाचा प्रिमियर इव्हेंट ४ डिसेंबरला हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला शुक्रवारी अटक झाली. अखेर संध्याकाळी सुनावणीनंतर तेलंगणा हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आणि आज त्याची सुटका झाली. त्यानंतर त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
द