Allu Arjun Reaction On Woman Death : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. अशात बुधवारी हैदराबाद येथील ‘संध्या’ चित्रपटगृहात एक मोठी दुर्घटना घडली. येथे प्रेक्षकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यामध्ये महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. तसेच अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण दुर्घटनेनंतर आता अल्लू अर्जुनने त्यावर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं आहे.

अभिनेत्यानं त्याच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तो म्हणाला, “संध्या थिएटरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनं माझं हृदय हेलावलं आहे. अशा परिस्थितीत या कुटुंबाच्या दु:खासाठी माझ्या मनातही संवेदना आहेत. मी त्यांना हे सांगू इच्छितो की, अशा कठीण काळात ते एकटे नाहीत. मी त्यांच्याबरोबर आहे. तसेच मी कुटुंबाची भेट घेण्यासाठी जाणार आहे. शोक व्यक्त करताना मी या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी कायम त्यांच्या मदतीसाठी उभा आहे आणि त्यांना सर्व प्रकारे सहकार्य करणार आहे.”

हेही वाचा : Bigg Boss 18: फराह खान भडकली तजिंदर बग्गासह ईशा सिंहवर, सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली…; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त करताना अल्लू अर्जुन पुढे म्हणाला, “मी कायम त्यांच्या मदतीसाठी उभा आहे. तसेच त्यांच्यासाठी मी २५ लाखांची मदत देऊ करत आहे.” अल्लू अर्जुनने चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना शेवटी एक विनंतीसुद्धा केली आहे. “प्रेक्षक जेव्हा चित्रपट पाहण्यासाठी येतील तेव्हा त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी”, असं आवाहन अल्लू अर्जुन या व्हिडीओमध्ये केलं आहे.

हेही वाचा : Video: लेकीच्या जन्मानंतर माहेरी आहे दीपिका पादुकोण, कॉन्सर्टमध्ये दुआच्या आईला पाहून दिलजीत म्हणाला…

मुलाची प्रकृती गंभीर

या घटनेत मृत पावलेल्या महिलेचं नाव रेवती आहे. ही महिला पती भास्कर आणि दोन लहान मुलांसह चित्रपट पाहण्यासाठी आली होती. त्यावेळी चित्रपटगृहात अल्लू अर्जुन आला होता. अभिनेत्याला एकदा तरी पाहता यावं यासाठी चाहत्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यात महिलेचा मृत्यू झाला. तसेच तिचा नऊ वर्षीय मुलगा श्रीतेज या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुलावर सिकंदराबादमधील KIMS रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप त्याची प्रकृती गंभीर आहे.

Story img Loader