Allu Arjun House Attack : हैदराबाद येथील एका सिनेमागृहात पुष्पा २ अर्थात पुष्पा द रुल या सिनेमाचा प्रीमियर ४ डिसेंबरला आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुन आला होता. त्याला बघण्यासाठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला. या प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. कारण हैदराबाद या ठिकाणी असलेल्या अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे आणि घरात घुसून तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणात आपला काहीही दोष नाही जे घडलं ते खेदजनक आहे, त्यासाठी मी माफीही मागतो असंही अल्लू अर्जुनने म्हटलं आहे. पण त्याच्याविरोधातला उद्रेक अजूनही पाहण्यास मिळतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घराच्या बाहेर उस्मानिया विद्यापीठाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी काही आंदोलक हे अल्लू अर्जुनच्या घरात घुसले आणि त्याच्या घराची तोडफोडही केली. तसंच अल्लू अर्जुनच्या घरावर टॉमेटो फेकले. ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुनने एक कोटी रुपये द्यावेत, शिवाय शक्य आहे तेवढी सगळी मदत करावी अशा दोन मागण्या या सगळ्या सदस्यांनी केल्या. या प्रकरणात आठ सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हैदराबाद येथील जुबिली हिल भागात अल्लू अर्जुनचं घर आहे. त्या ठिकाणी ही घटना घडली. ज्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घातलं आणि या सगळ्यांना पोलीस ठाण्यात नेलं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा अल्लू अर्जुन घरात नव्हता. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. मात्र हे सगळे आंदोलक खूप संतापले होते असं पोलिसांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- “फायर नहीं वाईल्ड फायर…” म्हणणारा ‘पुष्पा’ जेव्हा भावूक होतो..

अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर भाजपाची टीका

अल्लू अर्जुनच्या घरावर ज्यांनी हल्ला केला त्यांचा निषेध भाजपाने नोंदवला आहे. भाजपाचे आंध्र प्रदेशचे राज्य उपाध्यक्ष विष्णू वर्धन रेड्डी म्हणाले, “तेलंगणात काँग्रेस सरकारने अल्लू अर्जुनसारख्या कलाकाराला टार्गेट केलं आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. अल्लू अर्जुन हा अभिनेता दक्षिण भारतातला सर्वात मोठा करदाता आणि एक प्रतिथयश अभिनेता आहे. त्याच्या घरावर झालेला हल्ला आणि घराची केलेली नासधूस या बाबी निषेधार्ह आहेत. सामाजिकदृष्ट्या यशस्वी झालेल्या अल्लू अर्जुनसारख्या कलाकाराचा अपमान करुन काँग्रेसने राजकारण सुरु केलं आहे.” असाही आरोप रेड्डी यांनी केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun house attack by some people police detained eight people in this case scj