Allu Arjun Arrest : अभिनेता अल्लू अर्जुनला ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४) ला अटक झाली आणि त्याला तेलंगणातील चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले. तिथे त्याला कैदी म्हणून कुठले अन्न देण्यात याची माहिती तुरुंगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार तेलंगणा तुरुंग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अल्लू अर्जुनला तुरुंगात असताना भात आणि भाजी असे साधे जेवण देण्यात आले. अभिनेत्याने तुरुंग अधिकाऱ्यांकडून कोणत्याही विशेष सुविधेची मागणी केली नाही. त्याला चंचलगुडा सेंट्रल जेलच्या स्वतंत्र विभागात ठेवण्यात आले होते. याच विभागात हैदराबाद चेंगराचेंगरीतील केसमधील इतर आरोपीना ठेवण्यात आले होते.

हेही वाचा…अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर राम गोपाल वर्मा यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तेलंगणा सरकारने मुद्दाम…”

अल्लू अर्जुनला विशेष वर्ग कैद्याचा दर्जा

कोर्टाच्या आदेशानुसार, अल्लू अर्जुनला (Allu Arjun) विशेष वर्ग कैद्याचा दर्जा देण्यात आला होता. या वर्गात असलेल्या कैद्यांना एक खाट, टेबल, आणि खुर्ची यांसारख्या सुविधा दिल्या जातात. तेलंगणा तुरुंग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अल्लू अर्जुन कैदेत असताना नेहमीप्रमाणे वागत होता तो तणावग्रस्त वाटत नव्हता. त्याला संध्याकाळी भात आणि भाजी असे साधे जेवणाचे ताट देण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अल्लू अर्जुनला विशेष कैद्याचा दर्जा देण्यात आला होता असे तुरुंगातील विशेष पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

शनिवारी अंतरिम जामिनावर सुटका

अल्लू अर्जुनचा तुरुंगातील मुक्काम अल्पकाळासाठी होता. शनिवारी, तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला पण तरीही अर्जुनला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. अल्लू अर्जुनला शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४) संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी चंचलगुडा तुरुंगात आणले गेले आणि शनिवारी (१४ डिसेंबरला २०२४) सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी त्याला जामिनावर सोडण्यात आले.

हेही वाचा…अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर रवी किशन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा दिवस चित्रपटसृष्टीसाठी…”

शुक्रवारी उशिरापर्यंत तुरुंग अधिकाऱ्यांना जामिनाची प्रत मिळाली नव्हती, त्यामुळे हायकोर्टाने जामीन देऊनही अभिनेत्याला रात्र तुरुंगात काढावी लागली, अशी माहिती तुरुंगातील सूत्रांनी पीटीआयला दिली. अंतरिम जामीन आदेशात त्रुटी होती, त्यानंतर एक नवीन आदेश जारी करण्यात आला, जो शुक्रवारी रात्री उशिरा कारागृहात आला. जामिनाच्या प्रतीची तपासणी करणे आवश्यक होते, त्यामुळे अभिनेत्याची शुक्रवारी सुटका करणे शक्य नाही, असे तुरुंग प्रशासनाने नमूद केले होते. अखेर शनिवारी, (१४ डिसेंबरला) सकाळी त्याची सुटका करण्यात आली.

हेही वाचा…ना ‘मिर्झापूर’ ना ‘पंचायत’…; जगभरातील लोकांनी Google वर ‘या’ भारतीय वेब सीरिजला सर्वाधिक केलं सर्च

नेमके प्रकरण काय?

४ डिसेंबर २०२४ रोजी अल्लू अर्जुनने ‘पुष्पा २: द रूल’च्या प्रीमियरसाठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनाविरोधात एफआयआर नोंदवला आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी योग्य ती खबरदारी न घेतल्याचा आरोप केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun jail dinner and special facilities revealed by police officials psg