Pushpa 2 box office collection Day 12: अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘पुष्पा 2’ लवकरच जगभरात १५०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. चित्रपटाने १२ दिवसांत १४०० कोटी रुपयांहून जास्त व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. रविवारच्या तुलनेत सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाली. सोमवारी १२ व्या दिवशी चित्रपटाने जगभरात ३० कोटी रुपयांचे कलेक्शन केले.
५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले आहे. ‘पुष्पा 2’ यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘पुष्पा 2’ इतर भाषांपेक्षा हिंदीत जास्त कमाई करत आहे. तेलुगूपेक्षाही सिनेमाची हिंदीतील कमाई अधिक आहे. सोमवारी, चित्रपटाने भारतात २७.७५ कोटी रुपयांची कमाई केली. यापैकी हिंदी भाषेतील कमाई २१ कोटी रुपये आहे. तर, तेलुगूमध्ये ५.४५ आणि तमिळमध्ये एक कोटी रुपये कमावले.
u
सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, पुष्पा 2 चे भारतातील १२ दिवसांचे एकूण कलेक्शन ९२९.९५ कोटी रुपये आहे. यापैकी हिंदी भाषेत चित्रपटाने ५७३.१ कोटी रुपयांची कमाई केली, तर तेलुगू भाषेत १२ दिवसांत २८७.०७ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.
हेही वाचा – दिसण्याबद्दल विनोद करणाऱ्या कपिल शर्माला ॲटली कुमारने दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाला, “मी कसा दिसतो…”
१२ दिवसांत ‘पुष्पा 2’ ने आरआरआरच्या (१२३० कोटी रुपये) आणि यशच्या KGF: चॅप्टर 2 (१२१५ कोटी रुपये) कलेक्शनला मागे टाकले आहे. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. तो एसएस राजामौलींच्या बाहुबली 2चा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. या चित्रपटाने जगभरात १७९० कोटी रुपये कमावले होते. भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘दंगल’ आहे. आमिर खानच्या सिनेमाने जगभरात २०७० कोटी रुपये कमावले होते. आता अल्लू अर्जुनचा सिनेमा ‘बाहुबली 2’ व ‘दंगल’ चे रेकॉर्ड मोडतो का, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ चित्रपटाची निर्मिती मैथ्री मूव्ही मेकर्सने केली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानासह मल्याळम अभिनेता फहाद फासिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘पुष्पा 2’ हा अल्लू अर्जुनच्या २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सिक्वेल आहे. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.