अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’मध्ये दिसलेला अभिनेता जगदीश प्रताप याला ३४ वर्षीय महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अभिनेत्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पीडितेच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जगदीशने पीडितेची फसवणूक केली आणि तिचा छळही केला, त्यामुळे तिने आत्महत्या केली असा आरोप तिच्या वडिलांनी केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीशने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला काही लघुपट दिग्दर्शित केले होते. तेव्हा त्याला एक महिला भेटली होती. कालांतराने ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. नंतर मात्र दोघांचं नातं संपलं, मग जगदीशने तिला काही खासगी फोटो व व्हिडीओ पाठवले होते आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती, यामुळे तिने आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पंजागुट्टा पोलिसांनी तपास सुरू केला आणि जगदीशला बुधवारी (६ डिसेंबर) अटक केली. सध्या तो कोठडीत आहे. याबद्दल ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलं आहे.
‘ट्रॅक टॉलीवूड’च्या एका रिपोर्टनुसार, आत्महत्या करणारी ही महिला चित्रपटांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होती. तर जगदीशने ‘पुष्पा: द राइज’मध्ये अल्लू अर्जुनच्या मित्राची भूमिका केली होती. जगदीशने २०१९ मधील तेलुगू चित्रपट ‘मल्लेशम’मधून करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले होते मात्र, त्याला ‘पुष्पा: द राइज’मध्ये त्याला महत्त्वाची भूमिका मिळाली. तो काही दिवसांपूर्वी तो ‘पुष्पा: द रुल’चे शूटिंग करत होता, असंही म्हटलं जात आहे.