दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनच्या स्टाइलची व डायलॉगच्या चाहत्यांनाही भूरळ पडली होती. या चित्रपटातील डायलॉगचे अनेक रील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
‘पुष्पा’ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा दिग्दर्शक सुकुमार यांनी केली होती. त्यामुळे प्रेक्षकांनाही ‘पुष्पा २’बद्दल आतुरता होती. ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून आता चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ‘पुष्पा’पेक्षा या चित्रपटाचा सिक्वेल अधिक उत्कंठावर्धक व भव्यदिव्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करत आहेत.
हेही वाचा >> सारा खानला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर शुबमन गिलने सोडलं मौन, म्हणाला…
“दिग्दर्शक सुकुमार यांनी बॅंकॉक व इतर ठिकाणी चित्रपटाच्या शूटिंगसाठी टेस्ट शूटचे प्लॅनिंग केलं आहे. डिसेंबरमध्ये या चित्रपटाच्या टेस्ट शूटिंगला सुरुवात होणार आहे. त्यानंतर चित्रपटाच्या अंतिम शूटिंगचा विचार करण्यात येणार आहे. दिग्दर्शकाला घाईघाईत शुटिंग संपवून ‘पुष्पा २’ प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा नाही आहे. त्यामुळे २०२४च्या मार्च-एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो”, अशी माहिती चित्रपटाच्या टीममधील व्यक्तीने दिली आहे.
‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुनसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत होती. याशिवाय समांथा रुथ प्रभूही चित्रपटात आयटम सॉंग करताना दिसली होती. समांथाचं चित्रपटातील आयटम सॉंगही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.