‘पुष्पा 2’ च्या प्रिमियरदरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला व तिचा मुलगा रुग्णालयात दाखल आहे. या घटनेनंतर तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण पेटलं आहे. अभिनेता अल्लू अर्जुनला अटकही झाली होती. आता मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि अभिनेता अल्लू अर्जुन यांच्या शाब्दिक वाद सुरू झाले आहेत.
शनिवारी तेलंगणा विधानसभेत रेड्डी यांनी आरोप केला की अल्लू अर्जुनने पोलिसांनी परवानगी नसूनही थिएटरला भेट दिली. तसेच चेंगराचेंगरीत एका महिलेचा जीव गेल्यावरही तो तिथेच होता, त्यामुळे पोलिसांना त्याला बाहेर काढावं लागलं.
अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप फेटाळले. हे सर्व आरोप खोटे आणि बदनामी करणारे असल्याचं त्याने म्हटलंय. तसेच त्याने पोलिसांच्या सर्व सूचनांचे पालन केले होते, असा दावा केला. “मी बेजबाबदारपणे वागलो हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे आरोप चुकीचे आहेत. हे आरोप अपमानास्पद असून माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परवानगी नसती तर त्यांनी आम्हाला तिथून परत जायला सांगितलं असतं. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. मी त्यांच्या सूचना पाळल्या असत्या. मला अशा प्रकारची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती,” असं अल्लू अर्जुन म्हणाला.
अल्लू अर्जुनने म्हटलं की त्याने आपले करिअर आणि स्वतःची प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ घालवला आहे. अशातच या घटनेनंतर त्याच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत त्याने निराशा व्यक्त केली. महिलेच्या मृत्यूची माहिती असूनही थिएटरमध्ये थांबल्याच्या दाव्याबद्दल तो म्हणाला, “मी इतका अमानवी नाही.”
हेही वाचा – नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलंत का? फक्त ७५० रुपयांत केलेलं लग्न; ‘अशी’ झालेली दोघांची पहिली भेट
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत अल्लू अर्जुनवर कथितपणे रोड शो आयोजित केल्याबद्दल टीका केली होती. तसेच गर्दी असूनही त्याने चाहत्यांना अभिवादन केलं. थिएटर मॅनेजमेंटने ४ डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी पोलीस सुरक्षेची विनंती केली होती, पण थिएटरमध्ये मोजकेच एंट्री व एक्झिट पॉइंट असल्याने पोलिसांनी नकार दिला होता. यावर अल्लू अर्जुन म्हणाला, “हा रोड शो नव्हता. मिरवणूक नव्हती. थिएटरपासून काही मीटर अंतरावर जमलेली गर्दी होती.”
हेही वाचा – खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की अल्लू अर्जुनच्या सुरक्षारक्षकांनी चाहत्यांना बाजूला ढकललं, त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली. तसेच थिएटर मॅनेजमेंटने सुरुवातीला एका पोलीस अधिकाऱ्याला अभिनेत्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. अधिकारी कसाबसा तिथे पोहोचला आणि त्याला जायला सांगितलं, तेव्हा अभिनेत्याने नकार दिला, असा दावा त्यांनी केला होता.
नेमकी घटना काय?
पुष्पा २’ चित्रपटाचा प्रिमियर इव्हेंट ४ डिसेंबरला हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला १३ डिसेंबरला अटक झाली होती. त्याच दिवशी संध्याकाळी सुनावणीनंतर तेलंगणा हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आणि दुसऱ्या दिवशी त्याची चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली होती.
© IE Online Media Services (P) Ltd