‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारा अभिनेता अल्लू अर्जुन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पण आता अल्लू अर्जुनच्या नावाची चर्चा एका वेगळ्याच कारणानं होताना दिसतेय. अल्लू अर्जुननं असं काही केलं आहे की त्याच्या या कृतीने सर्वांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. अल्लू अर्जुननं तगड्या मानधनाची तंबाखूची एक जाहिरात नाकारली आहे. ज्यामुळे आता त्याचं नाव सगळीकडेच चर्चेत आहे.

पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार, तंबाखूचं उत्पादन करणाऱ्या एका कंपनीनं आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी अल्लू अर्जुनला बरीच मोठी रक्कम ऑफर केली होती. मात्र अल्लू अर्जुननं क्षणाचाही विलंब न करता ही ऑफर नाकारली. यासोबतच त्यानं या मागचं कारणही स्पष्ट केलं. ‘माझ्या चाहत्यांनी मला किंवा माझ्या जाहिराती पाहून तंबाखूचं सेवन करावं असं मला वाटत नाही.’ असं त्यानं ही ऑफर नाकारताना दिलेल्या स्पष्टीकरणात सांगितलं.

आणखी वाचा- “मित्रांना माझ्यापेक्षा आईच जास्त…” श्वेता तिवारीच्या मुलीचं वक्तव्य चर्चेत

सूत्रांच्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन स्वतः तंबाखू किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीचं सेवन करत नाही. त्यामुळे त्यानं ही ऑफर लगेच नाकारली. चित्रपटांमध्ये कथेची गरज म्हणून अल्लू अर्जुन सिगारेट ओढताना दिसत असला तरीही खऱ्या आयुष्यात मात्र तो या सर्व गोष्टींपासून खूप दूर आहे. त्यामुळे तो कोणतीही जाहिरात विचार करूनच साइन करतो. आपल्या जाहिरातींमुळे लोकांमध्ये गैरसमज पसरेल किंवा चुकीचा संदेश जाईल अशा जाहिराती करणं तो नेहमीच टाळतो.

आणखी वाचा- Video : बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत शहनाझ- शाहरुखमध्ये दिसलं खास बॉन्डिंग, व्हिडीओ चर्चेत

दरम्यान अशाप्रकारची मोठ्या मानधनाची जाहिरात नाकारणारा अल्लू अर्जुन हा पहिलाच अभिनेता नाही. त्याच्या अगोदर साई पल्लवी, विराट कोहली, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर या सेलिब्रेटींनीही अशाप्रकारच्या मोठ्या मानधनाच्या जाहिरातींमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच ‘पुष्पा: द रूल’मध्ये दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader