Allu Arjun : अनेक दिवसांपासून अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांत धडकला. भारतातच नाही, तर संपूर्ण जगभर या चित्रपटावर चाहत्यांनी प्रेम केलं. अल्लू अर्जुनचा डॅशिंग लूक, रश्मिकाबरोबरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात भरली आहे. सर्वत्र याच चित्रपटाचं कौतुक सुरू आहे.
सोशल मीडियावर दोन दिवसांपासून सतत ‘पुष्पा २’ पाहून आलेल्या व्यक्तींच्या छान प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अल्लू अर्जुन काही वर्षांपासून या दोन्ही चित्रपटांसाठी काम करीत आहे. त्याच्यासह रश्मिका मंदाना आणि चित्रपटाची सर्व टीम चित्रपट हिट व्हावा म्हणून मेहनत घेत आहे. त्यामुळे इतक्या वर्षांत येथील सर्व टीमसाठी हे एक कुटुंब झाले आहे. अशात आता सर्व कामे संपवून अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना त्यांच्या यशाचा आनंद घेत आहेत. तसेच चित्रपटाच्या प्रमोशनमुळे विविध ठिकाणी ते भेट देत आहेत, मुलाखती देत आहेत.
हेही वाचा : Bigg Boss 18: “…तर तू थेट शो बाहेर होशील”, फराह खानने रजत दलालला चांगलंच झापलं अन् दिली शेवटची ताकीद, म्हणाली, “तू स्वतःला…”
मुलीपासून दुरावला अल्लू अर्जुन
दरम्यान, अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमामध्ये त्याच्या मुलीची त्याला किती आठवण येत होती, याबद्दल तो व्यक्त झाला आहे. बाप आणि लेकीचं नातं सर्वांत खास आणि वेगळं असतं. अशात मुलीबद्दल सांगताना अल्लू अर्जुन म्हणाला, “गेल्या तीन ते चार वर्षांत मी मुलीला जवळ घेतलेलं नाही, तिला किस केलेलं नाही. कारण- माझी दाढी फार जास्त वाढलेली आहे आणि मी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होतो. आता लवकरात लवकर हे सर्व संपवून मला मुलीला जवळ घ्यायचं आहे.”
रश्मिका मंदाना रडू लागली
दरम्यान, या कार्यक्रमात अल्लू अर्जुनने शूटिंग संपल्यावर त्याच्या आणि रश्मिकाच्या भावना काय होत्या हेसुद्धा त्यानं सांगितलं आहे. तो म्हणाला, “रश्मिकाचं शूटिंग माझ्या एक दिवस आधी संपलं होतं… ती माझ्यासमोर आली आणि तिच्या डोळ्यांत अश्रू आले. मी तिला म्हणालो की, काय झालं तू का रडत आहेस? त्यावर ती म्हणाली, सर, माझ्या आयुष्यातील जवळपास पाच वर्षे मी या चित्रपटांसाठी काम करतेय. त्यामुळे ही संपूर्ण टीम आणि येथील व्यक्ती मला माझ्या कुटुंबाप्रमाणे वाटत आहेत. त्यावर मी तिला सांगितलं की, हो आम्हालापण तुझी फार आठवण येईल… आणि मी अगदी साध्या पद्धतीनं तिला म्हटलं, की ठीक आहे… आपल्याला आयुष्यात पुढे जावं लागेल.”
पुढे अल्लू अर्जुन म्हणाला, “रश्मिकाला हे सर्व सांगताना मी स्वत: अगदी नॉर्मल होतो. मला विशेष असं काही वाटत नव्हतं. मात्र, दुसऱ्या दिवशी माझं शूटिंग संपलं आणि मी अगदी शांत झालो. माझ्यासाठी येथून जाणं फार कठीण झालं. कारण- पाच वर्षांपासून आम्ही त्याच चेहऱ्यांना रोज पाहत होतो, त्याच व्यक्तींबरोबर वेळ घालवत होतो.”
हेही वाचा : ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ फेम कॉमेडियन कबीर सिंगचे निधन, ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
‘पुष्पा २’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर मोठी गर्दी केली आहे. प्रत्येक जण चित्रपट फार छान आहे आणि पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात सर्वांनीच जास्त मेहनत घेतली आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहे.