सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. पण या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनला त्रास होत आहे.
अल्लू अर्जुनने नुकतीच ‘दैनिक भास्कर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने चित्रपटाशी संबंधीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. चित्रपटातील पात्रासारखी तुझी बॉडी लँग्वेज अजिबात नाही. तीन तासांच्या चित्रपटात ती कशी निभावलीस? असा प्रश्न अल्लू अर्जुनला विचारण्यात आला होता. त्यावर अल्लू अर्जुनने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा नवा रेकॉर्ड, जगभरात कमावले ‘इतके’ कोटी
या चित्रपटातील पात्रासाठी दिग्दर्शकाने मला काही तरी खास करावे लागणार असे सांगितले होते. जेणे करुन चित्रपटगृहांमधील प्रेक्षक तुला पाहून ते फॉलो करतील, तशा प्रकारे चालतील. त्यानंतर तीन-चार कल्पना सुचवण्यात आल्या होत्या. पण खांदा उचलण्याची कल्पना सर्वांना आवडली. एक खांदा थोडा वर ठेवणे हे थोडं वेगळं आणि हिरोगिरी करण्यासारखं वाटतं. खरं तर हे तीन तासांचे काम नाही तर दोन वर्षांची मेहनत आहे. माझा खांदा आजही दुखतो. मला त्याने त्रास होतो.
‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे.