Allu Arujn Pushpa 2 : हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी पुष्पा २ चित्रपटाच्या प्रीमियर वेळी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुनला मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. पोलिसांनी सोमवारी अभिनेत्याला नोटीस बजावून मंगळवारी सकाळी ११ वाजता चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले. यानंतर अल्लू अर्जूनची लिगल टीम त्याच्या निवासस्थानी पोहोचली आहे. संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबर रोजी “पुष्पा २: द रुल” च्या प्रीमियर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

अटक आणि सुटका

या घटनेनंतर थिएटर व्यवस्थापन, अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाव गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. शहर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, त्याच दिवशी तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आणि दुसऱ्याच दिवशी त्याची तुरुंगातून सुटका झाली. आता अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांची नवी नोटीस आली असून, त्याचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी पोलीस उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहेत.

हैदराबादचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कायदेशीर मत घेऊन या प्रकरणात पुढील कारवाई करणार आहेत. अल्लू अर्जुनने केलेले दावे खोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्तांनी रविवारी संध्या थिएटरमधील घटना घडली त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेजही जारी केले होते.

हे ही वाचा : “आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट

आरोप-प्रत्यारोप

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी नुकताच विधानसभेत दावा केला की, अल्लू अर्जुनने पोलिसांनी परवानगी नसतानाही थिएटरला भेट दिली होती. त्याचबरोबर चेंगराचेंगरीत एका महिलेचा जीव गेल्यावरही तो तिथेच थांबला होता, त्यामुळे पोलिसांना त्याला बाहेर काढावे लागले.

मुख्यमंत्र्यांच्या आरोपांनंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत रेवंथ रेड्डींचे आरोप फेटाळून लावले होते. सर्व आरोप खोटे आणि बदनामी करणारे असल्याचे अल्लू अर्जुनने म्हटले होते. अल्लू अर्जुन म्हणाला होता की, “मी बेजबाबदारपणे वागलो हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे आरोप अपमानास्पद असून माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परवानगी नसती तर त्यांनी आम्हाला तिथून परत जायला सांगितले असते. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. मी त्यांच्या सूचना पाळल्या. मला अशा प्रकारची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.”

Story img Loader