अल्लू अर्जून हा लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता आहे. त्याने ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. त्याचा पुष्पा चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांची क्रेझ अजूनही पाहायला मिळते. नुकताच अल्लू अर्जुन न्यूयॉर्कमध्ये पोहोचला. त्याठिकाणी त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. न्यूयॉर्कमधील वार्षिक इंडिया डे परेडमध्ये ग्रँड मार्शल म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्याला भेटण्यासाठी चाहत्यांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर इंडिया डे परेडचे व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. यावेळी त्याच्यासमवेत त्याची पत्नी स्नेहा रेड्डीदेखील या परेडमध्ये सहभागी झाली होती. अल्लू अर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर, त्याची पत्नी पिवळ्या पारंपारिक पोशाखात अत्यंत सुंदर दिसत होती. भारतीय ध्वज फडकावतानाचा एक व्हिडीओ त्याने शेअर केलाय. “न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडमध्ये ग्रँड मार्शल होणे हा एक सन्मान होता,” असं कॅप्शन त्याने व्हिडीओला दिलंय. तसेच आणखी एका व्हिडीओत ‘ये भारत का तिरंगा है, कभी झुकेगा नहीं’ हा डायलॉग त्याने पुष्पाच्या टोनमध्ये म्हटला आहे.
अल्लू अर्जूनचे या परेडमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकरी त्याच्या डायलॉगचे भरभरून कौतुक करत आहेत. एकंदरीतच पुष्पामधून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याने न्यूयॉर्कमध्ये त्याच्या डायलॉग आणि कृतीने भारतीयांची मनं जिंकली आहेत.