अनेकदा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा होते. कधी चित्रपटाच्या ट्रेलरमधील दृश्यांना काहींचा आक्षेप असतो तर कधी त्यातील संवाद काहींना आभेपार्ह वाटतात. तमिळ चित्रपट ‘आदाई’ त्यातील एका बोल्ड दृश्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री अमला पॉलचा न्यूड सीन दाखवण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र दिलं असून अनेकांनी या दृश्यावर आक्षेप नोंदवला आहे. तर राजकीय नेत्या प्रिया राजेश्वरी यांनी अमलाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
चित्रपटाद्वारे न्यूडिटी पसरवल्याबद्दल अमलाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे. अशा दृश्यांमुळे तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘अ’ प्रमाणपत्र दिलं असलं तरी यातील न्यूड सीनवर कात्री लावलेली नव्हती.
चर्चेचा विषय ठरत असलेला हा न्यूड सीन करताना सेटवर १५ जण उपस्थित असल्याचे अमलाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. ‘तो सीन शूट करण्यासाठी मी सेटवर पोहोचले तेव्हा मनावरील दडपण मला अधिक प्रकर्षाने जाणवलं. तो सीन शूट करताना सेटवर कोण कोण उपस्थित असेल?, सेटवर पुरेशी सुरक्षा असेल ना? सेटवरचं वातावरण कसं असेल? या गोष्टींचाच विचार माझ्या मनात सुरु होता. हा न्यूड सीन चित्रित करण्यासाठी विशेष सेटची व्यवस्था करण्यात आली होती. सेटवर केवळ १५ जणांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. चित्रपटाच्या चित्रीकरण टीममधील त्या पंधराही जणांवर माझा विश्वास होता. तो विश्वास नसता तर मी इतक्या बोल्ड सीनचं चित्रीकरण करुच शकले नसते’ असं अमला म्हणाली होती.