रेश्मा राईकवार
गाणं संपलं तरी काही सूर मनात गुंजत राहतात, एखादी कादंबरी वाचून संपली तरी त्यातली गोष्ट, पात्रं कित्येक काळ मनात रेंगाळत राहतात. मनात रुंजी घालत राहणाऱ्या सुरांची साथसंगत असलेली आपल्यासारख्या माणसांची गोष्ट जेव्हा पडद्यावर बोलकी होते तेव्हा त्यात आणि आपल्यात अंतर असं काही उरतच नाही. आपलीच होऊन जातात ती पात्रं.. कळत नकळत अंत:करणात उमटत राहतात ते सूर आणि त्या सुरांमागच्या पात्रांची लयदार गोष्ट. असाच काहीसा तरल, सुरेल आणि भावगर्भ अनुभव ‘अमलताश’ पाहिल्यावर मनाच्या तळाशी उरतो.
संगीतातच रमणारे दोन जीव एकत्र आले तर तो प्रवास कसा असेल? ‘अमलताश’ हा सुहास देसले लिखित, दिग्दर्शित चित्रपट अथपासून इतिपर्यंत सुरांत चिंब न्हाऊन निघालेला आहे. गाण्याचे सूर, वाद्यांचे सूर आणि या चित्रपटातील पात्रं वेगळी काढताच येऊ शकत नाहीत. सूर-ताल अंगात भिनलेली ही पात्रं आहेत. राहुल आणि त्याच्या मित्रांचा बँड आहे. काही कारणांमुळे हा बँड बंद झाला असला तरी गाणं त्यांच्या आयुष्यातून गेलेलं नाही. प्रत्येकाचे आपापल्या जगण्याचे व्याप आहेत. संसार आहे, कुटुंब आहे, उद्योग-धंदा आहे. या चित्रपटाचा नायक राहुल (राहुल देशपांडे) उत्तम गायक आहे, वादक आहे. त्याला सुरांची उत्तम जाण आहे. तो संगीत रचनाही करतो. राहुल आणि त्याचा मित्र पवन दोघे तालवाद्यांशी संबंधित व्यवसाय करतात. त्यामुळे दिवसभर या ना त्या कारणाने दोघंही सुरात रमलेले आहेत. रोजचं काम सांभाळून मित्रांचं एकत्र येणं, कधीतरी जॅिमग करणं, कुटुंबाबरोबर एकत्र असणं अशी एक घट्ट सुरेल नात्यांची उबदार वीण या चित्रपटात आहे. सगळं कसं नेहमीच्या सरावाने त्याहीपेक्षा रोजच्या लयीत सुरू असताना मध्येच कुठेतरी राहुलच्या प्रकृतीची तार बिघडलेली आहे हे आपल्याला जाणवतं, पण ते खटकण्याइतकं नाही. या रंगतदार कुटुंबात कॅनडातून आलेल्या कीर्तीच्या रूपाने आणखी एक धागा जोडला जातो. कीर्तीलाही गाण्याची आवड आहे, गाणी आणि वाद्यांच्या निमित्ताने राहुलशी कीर्तीची भेट होते. दोघांचे सूर जुळू लागतात. हळूहळू मैत्री आणि मग प्रेमाचं गाणं रंगू लागतं. या दोघांचं भावविश्व आणि ते दोघं एकत्र या जुन्याच कुटुंबाशी नव्याने जोडले गेल्यानंतर बहरत गेलेले सूर हा सगळाच अनोखा प्रवास पडद्यावर अनुभवावा असा आहे.
हेही वाचा >>>Video: ‘मिस वर्ल्ड २०२४’च्या महाअंतिम सोहळ्यासाठी पोहोचल्या अमृता फडणवीस; क्रिती सेनॉन, पूजा हेडगेसह करणार परीक्षण
‘अमलताश’ या चित्रपटाची कथा सुहास देसले यांची आहे. पटकथा लेखन सुहास आणि मयूरेश वाघ यांनी केलेलं आहे. राहुल देशपांडे गायक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा अभिनयही रंगभूमीवर आणि चित्रपटातून प्रेक्षकांनी अनुभवलेला आहे. मा्त्र इथे दिसणारे राहुल देशपांडे त्यांच्या आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्ण वेगळे आहेत. गाणं जगणाऱ्या आणि जगण्यावर समरसून प्रेम करणाऱ्या राहुलशी ते जणू तादात्म्य पावले आहेत.. पडद्यावरचा राहुल आणि प्रत्यक्षातील राहुल वेगळे नाहीतच जणू.. कीर्तीच्या भूमिकेतील पल्लवी परांजपे ही उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण तिचं गाणंही तितकंच सहजसुंदर आहे. या दोघांसह अगदी सुहास देसले यांच्यासह चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा संगीताशी कुठेतरी जोडला गेलेला आहे. त्याला संगीताचं उत्तम ज्ञान आहे. त्यामुळे पडद्यावर हे सगळे कलाकार एकत्र येतात तेव्हा कुठल्याही प्रकारचा खोटेपणा वा अभिनिवेश उरत नाही. सहज एक मैफल जमावी, सहज भावा-बहिणींच्या गप्पा व्हाव्यात, सहज भाचीला शाळेत सोडणारा, तिचे लाड पुरवणारा मामा भेटावा इतकी आपल्या घरातली गोष्ट वाटावी अशा सहजतेने हे चित्रण करण्यात आलं आहे. पुण्यातली सदाशिव पेठ, तिथले वाडे, जुन्या पद्धतीची घरं, अरुंद माळे हे सगळं चित्रण खूप सुंदर आहे. चित्रपट संगीतमय आहे. तो गाण्यांतून, सुरांतून अधिक बोलतो, नुसतीच पियानोवर फिरणारी बोटं वा एकतानतेने तारा दुरुस्त करणारी राहुलची नजर, लकब या सगळय़ातून चित्रपट बोलत राहतो. यातल्या पात्रांचा दृष्टिकोन जगावेगळा आहे असंही नाही. सुंदर, निर्मळ असं काही गवसतं आणि मग ते टिकवण्याच्या धडपडीपेक्षा आहे त्या क्षणांत ते अनुभवावं, त्याचा आनंद घ्यावा असा काहीसा तरल अनुभव देणारा ‘अमलताश’ हा एक वेगळाच भावानुभव आहे.
अमलताश
दिग्दर्शक – सुहास देसले
कलाकार – राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, दीप्ती मते, भूषण मते, त्रिशा कुंटे, प्रतिभा पाध्ये, जेकब पणीकर, ओमकार थत्ते.