अमरनाथमधील पवित्र गुहा परिसरात ढगफुटी झाल्याची घटना शुक्रवारी (८ जुलै) घडली. ढगफुटी झालेल्या भागामध्ये अनेक भाविक अडकले होते. ढफुटीची घटना घडल्यानंतर लगेचच बचावकार्यास सुरुवात करण्यात आली. या घटनेदरम्यानचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल झालेल्या या घटनेमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच सोशल मीडियाद्वारे अनेकांनी दुःख व्यक्त करण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा – अग्गंबाई सूनबाई! सासूबाईंना वाढदिवसाला आलिया भट्टने काय दिलं पाहा?, नीतू कपूर म्हणाल्या…
अभिनेता अक्षय कुमारने देखील याबाबत एक ट्विट केलं आहे. अक्षयने ट्विट करत म्हटलं की, “अमरनाथ मंदिराच्या पवित्र गुहेजवळील बालटाल येथे ढगफुटीमुळे जीवितहानी झाली. हे ऐकून फारच दुःख झालं. सर्वांच्या शांती आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.” अक्षयने याबाबत ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे.
तर दुसरीकडे अभिनेत्री रवीना टंडनने देखील या घटनेबाबत ट्विट केलं आहे. रवीनाने या घटनेचा व्हिडीओ शेअर करत “प्रार्थना” असं म्हटलं आहे. अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीनंतर सोशल मीडियाद्वारे अनेक जण व्यक्त होताना दिसत आहेत. या घटनेनंतर रात्रभर बचावकार्य सुरु होतं.
अमरनाथ गुहेच्या परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता ढगफुटी झाली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पर्वतांमधून जोरदार हवा तसेच पावसामुळे भाविकांचे २५ टेंट वाहून गेले होते. तर पावसामुळे येथील परिसरात पाणी साचले होते. शुक्रवारी रात्री मिळालेल्या वृत्तानुसार, मृतांची संख्या १५ वर पोहोचली होती.