गेल्या वर्षभरापासून करोनाचे काळे ढग आपल्या डोक्यावरून जायचं काही नाव घेत नाही आहेत. तेव्हा पासून जशी काही सगळ्या गोष्टींना नजरच लागली होती. मात्र, आता हळूहळू सगळ्या गोष्टी पुर्वपदावर येत आहेत. गेल्या वर्ष भरात जे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होते ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातील एक मराठी चित्रपट म्हणजे ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरनेच प्रेक्षकांची मने जिंकली. आता लवकरच या चित्रपटाचं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
आता हीच उत्सुकता अधिक न ताणता या कौटुंबिक नाट्याचा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला आहे. या अल्बने देखील ट्रेलर प्रमाणे प्रेक्षकांची मने जिकंली आहेत. यातील आई-बाबा हे गाणं हे अतिशय सुंदर असून यातून प्रेम आणि नवीन आयुष्य कशा प्रकारे साजरा करण्याविषयी सांगण्यात आलं आहे.
“संगीत हा आमच्या ‘वेल डन बेबी’ चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक गाण्याला सखोल असा अर्थ आहे. प्रसंगांना साजेशा असलेल्या या गाण्यांमुळे चित्रपट नक्कीच एका वेगळ्या उंचीवर जातो. रोहन-रोहन ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिभावंत जोडी असून त्यांनी ‘वेल डन बेबी’चे संगीत तयार केले आहे,” असे अभिमेता आणि निर्माता पुष्कर जोग म्हणाला.
गाण्या विषयी पुढे बोलताना पुष्कर म्हणाला की, ‘आई-बाबा’ या प्रदर्शित झालेल्या पहिल्या गाण्याला चित्रपटात ओटी भरण्याची पार्श्वभूमी लाभली आहे. चित्रपटातील दाम्पत्याला बाळाच्या आगमनाची चाहूल लागली असून त्यांच्या जीवनातील हा गोड भाग या गाण्यातून समोर येतो. प्रत्येक गाणं हे सर्जनशील लेखणीतून साकारलं आहे. त्याचे चित्रीकरण देखील उत्तम झाले आहे.”
‘आई बाबा’ हे गाणं रोहन प्रधान याने गायले असून त्यानेच त्याचे संगीत संयोजन देखील केले आहे. तर वलय मुळगुंद याच्या दमदार लेखणीतून ते शब्दबद्ध झाले आहे. संगीत संयोजनात रोहन गोखले याने देखील आपली भूमिका चोख निभावली असून उर्वरीत गाण्यांना अर्पिता चक्रवर्ती या गायिकेचा स्वरसाज लाभला आहे.
‘वेल डन बेबी’ हा चित्रपट प्रियांका तन्वर हिने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात मध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका आहेत. आनंद पंडित, मोहन नाडर आणि पुष्कर जोग हे सिनेमाचे निर्माते आहेत. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.