अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा येत्या १२ जुलैला मुंबईत पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबानींच्या घरच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा चालू आहे. २०२३ च्या सुरुवातीला साखरपुडा पार पडल्यावर अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा यावर्षी मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांसह हॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली होती. यानंतर अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीच्या क्रुझवर पार पडला. आता सध्या अंबानींच्या अँटालिया या राहत्या घरी अनंत-राधिकाचे लग्नाआधीचे विधी संपन्न होत आहे.
अनंत – राधिकाचा हळदी व मेहंदी समारंभ अँटालियावर नुकताच पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांपासून ते राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. हळदी समारंभात सगळ्यांनीच खास लूक केले होते. परंतु, या सगळ्यांमध्ये अंबानींच्या होणाऱ्या सुनबाईंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राधिका मर्चंटने हळदीसाठी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अनामिका खन्नाने डिझाइन केलेला पिवळा रंगाचा सुंदर असा लेहेंगा परिधान केला होता.
हेही वाचा : जेव्हा शाहरुख खानचा मेसेज आला…; लग्नाच्या दिवशीचा Unseen फोटो शेअर करत सोनाक्षी सिन्हाने सांगितला खास किस्सा
राधिका या हळदी समारंभातील लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. तिने या ड्रेसवर सुंदर अशी ताज्या फुलांनी सजवलेली ओढणी घेतली होती. ही संपूर्ण ओढणी तगर आणि ९० हून अधिक झेंडूच्या फुलांनी तयार केली होती. यावर तिने फुलांनी घडवलेले दागिने घातले होते. राधिकाची ही सुंदर ओढणी तयार करण्यासाठी तब्बल २४ तासांहून अधिक कालावधी लागल्याचं फ्लोरल आर्ट्ची व्यवस्थापक सृष्टी कपूरने ‘न्यूज १८’शी संवाद साधताना सांगितलं. राधिकाच्या या हटके लूकची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा १२ जुलैला मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपारिक हिंदू पद्धतीने पार पडणार आहे. शुक्रवार १२ जुलै रोजी अनंत-राधिका सात फेरे घेणार आहेत. यानंतर शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. तसेच रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.