Anant Ambani And Radhika Merchant Sangeet Ceremony : अंबानी कुटुंबीयांच्या घरी नुकताच अनंत – राधिकाचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी खास हॉलीवूडचा लोकप्रिय गायक जस्टिन बिबर परदेशातून भारतात आला होता. याशिवाय या संगीत सोहळ्याला सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. आलिया भट्ट, रणबीर कपूर, रणवीर सिंह, सलमान खान, मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, बॉलीवूडचे स्टारकिड्स असे सगळे मान्यवर अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला उपस्थित होते.
सध्या अंबानींकडे पार पडलेल्या संगीत सोहळ्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता एका नवीन व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण अंबानी कुटुंब एकत्र डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. नव्या सुनेच्या स्वागतासाठी सध्या नीता व मुकेश अंबानी जय्यत तयारी करत आहेत. याचाच एक भाग म्हणून संगीत सोहळ्यात या संपूर्ण कुटुंबाने नव्या सुनेसह जबरदस्त डान्स केला.
‘ओम शांती ओम’ हा शाहरुख खानचा चित्रपट २००७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील ‘ओम शांती ओम’ हे शीर्षक गीत आयकॉनिक ठरलं होतं. कारण, बॉलीवूडचे असंख्य सेलिब्रिटी या गाण्यात झळकले आहेत. त्यामुळे अंबानी कुटुंबीयांनी एकत्र डान्स करण्यासाठी या गाण्याची निवड केली. मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता, आकाश व श्लोका, होणारी नवीन सून राधिका व नवरदेव अनंत यांच्या जोडीला अंबानींची लाडकी इशा व जावई आनंद पिरामल देखील या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्यांनी एकत्र केलेल्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. विरल भय्यानी या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
आता येत्या १२ जुलैला ही अनंत-राधिका विवाहबंधनात अडकून आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. १४ जुलैपर्यंत लग्नाचे सगळे विधी पार पडणार आहे. या लग्नासाठी खास देश-विदेशातील पाहुणे उपस्थित राहणार आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाचे सगळे विधी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपरिक हिंदू पद्धतीने होणार आहेत.
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’चं वर्चस्व कायम! शिवानी सुर्वेच्या नव्या मालिकेला कला व मुक्ताने काढलं मागे, पाहा TRPची यादी
लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान-सलमान खान, बच्चन कुटुंब, विराट कोहली-अनुष्का शर्मा, विकी कौशल, कतरिना कैफसह अनेक स्टार्सची नावे आहेत. याशिवाय बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टीफन श्वार्झमन, बॉब इगर, इवांका ट्रम्प यांच्यासह अनेक परदेशी पाहुणे देखील भारतात उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.