हॉलिवूड अभिनेत्री अँबर हर्ड आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढत आहेत. अँबरने जॉनीवर अनेक गंभीर आरोप केले होते, त्यानंतर जॉनी डेपने तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल दिला होता. तसेच अँबर हर्डने १.५ कोटी अमेरिकी डॉलरची नुकसानभरपाई जॉनीला द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. पण यानंतरही दोन्ही पक्षांमध्ये सहमती होऊ शकली नव्हती. अशातच आता अँबरने या मानहानी प्रकरणात तडजोड करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, याआधी अँबरने एक पोस्ट शेअर करत तिने आधी तडजोडीचा निर्णय का घेतला नव्हता, याबद्दल सांगितलंय.
अँबर हर्डचा पूर्वाश्रमीचा पती जॉनी डेपने तिच्याविरुद्ध दाखल केलेल्या कोट्यवधी डॉलरच्या मानहानीच्या खटल्यात आता ती तडजोड करायला तयार झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली. खूप विचाराअंती आपण या निर्णयावर पोहोचल्याचं तिने म्हटलंय. मला कधीच हा पर्याय निवडायचा नव्हता, पण आता आपण आणखी एका खटल्याला सामोरं जाऊ शकत नसल्याचं अँबरचं म्हणणं आहे. अँबर हर्डने तिच्या नोटमध्ये असं म्हटलंय की “मी अमेरिकन कायदेशीर व्यवस्थेवरील विश्वास गमावल्यानंतर हा निर्णय घेत आहे. मला तडजोडीचा निर्णय कधीच घ्यायचा नव्हता आणि मी सत्य सांगितलं, पण तेही नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या प्रकरणांमध्ये महिला समोर येऊन बोलायची हिंमत करतात, तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो. माझी सोशल मीडियावर बदनामी करण्यात आली. ज्या गोष्टीतून गेली सहा वर्षे मुक्त होण्याचा मी प्रयत्न करतेय, त्यासाठी ही एक संधी आहे, म्हणून मी हा पर्याय निवडतेय,” असं अँबर हर्डने म्हटलंय.
दरम्यान, २०१८ मध्ये ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधील एका लेखात हर्डने डेपवर गंभीर आरोप केले होते. आपण कौटुंबिक हिंसाचाराने पीडित असून जॉनीने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप या लेखात करण्यात आला होता. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर जॉनी डेपने अँबरने माझी बदनामी केल्याचा आरोप करून तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आणि पाच कोटी डॉलरची मागणी केली होती. त्याविरोधात अँबरनेही शारीरिक हिंसा आणि छळाचा दावा करत १० कोटी डॉलरची मागणी केली. त्यानंतर या खटल्याची सुनावणी पार पडली, त्यात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले होते. सुनावणीअंती न्यायालयाने डेपची बाजू योग्य असल्याचे सांगत हर्डला १.५ कोटी डॉलरची भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्याशिवाय न्यायालयाने डेपलाही दंड सुनावत २० लाख डॉलरची भरपाई देण्यास सांगितले होते. पण आपण जॉनीला इतकी नुकसानभरपाई देण्यास समर्थ नसल्याचं अँबरने म्हटलं होतं.