झोप ही प्रत्येकाची गरज आहे हे खरं असलं तरी कधी कधी ही झोप महागडी ठरू शकते, याची प्रचीती अभिनेत्री अम्बर रोसने नुकतीच घेतली आहे. मायामी दौऱ्यावरून परतलेली अम्बर घरी पोहोचताक्षणी झोपी गेली. तिचे कुटुंबीय आणि सुरक्षारक्षक आपापल्या शयनकक्षात विश्राम करत होते. त्या दरम्यान एका व्यक्तीने घरात प्रवेश केला आणि तब्बल चार तास तो घरात काहीतरी शोधत होता. सकाळी झोपून उठल्यानंतर घरातील अस्ताव्यस्त सामान पाहून अम्बरने अक्षरश: गोंधळ घातला. मात्र घरातील नोकरमंडळी आणि सुरक्षारक्षकांना जाब विचारूनही अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे तिने रीतसर पोलीस तक्रार केली.
पोलिसांनीही संपूर्ण प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आणि तासाभरातच आपले तपास कार्य सुरू केले. सर्वात प्रथम कुटुंबीय आणि सुरक्षारक्षकांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही फूटेज पाहिले त्यात एक व्यक्ती स्वयंपाक घराच्या खिडकीतून आत येताना दिसली. ही व्यक्ती संपूर्ण घरात कशाचा तरी शोध घेत होती. पण ती व्यक्ती कोण? घराबाहेरील अद्ययावत सुरक्षायंत्रणा भेदून तो आत पोहोचलाच कसा? खिडकीचे ग्रील आणि काच फोडताना त्याला कोणी पाहिले कसे नाही? घरातील अनेक किमती वस्तूंकडे दुर्लक्ष करून तो नेमके काय शोधत होता? घरातील सामान अस्ताव्यस्त करत असताना त्याची चाहूल कोणालाच कशी लागली नाही? आणि जाताना तो नेमके काय घेऊन गेला? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.