रूपेरी पडद्यावर राजकीय विषयांवरील चित्रपट मोठय़ा प्रमाणात येतात. देशातील राजकारण, राजकारण्यांचे गुन्हेगारांशी असलेले संबंध या विषयांवरील चित्रपट येतात. या चित्रपटात राजकीय नेता आणि त्याचा निष्ठावान कार्यकर्ता यांच्यातील संघर्ष दिग्दर्शकाने परिणामकारक पद्धतीने साकारला आहे. दमदार आणि वेगवान असलेला हा चित्रपट प्रेक्षकाला हिंदी चित्रपटसृष्टीतील राजकीय धर्तीवरील अ‍ॅक्शनपटांचे दर्शन घडविण्यात यशस्वी ठरला आहे.
शंकर गावडे (चिन्मय मांडलेकर) हा वनमंत्री प्रकाशदादा जाधव (मुरली शर्मा) यांचा निष्ठावान कार्यकर्ता असला तरी सभा-मोर्चे यांसाठी भाडोत्री माणसे पुरविणे हा त्याचा व्यवसाय आहे. प्रकाशदादांसाठी शंकर आणि तो राहत असलेल्या गोपाळपाडामधील त्याचे सख्खे सोबती, साथीदार जीव द्यायलाही तयार आहेत. वनमंत्री प्रकाशदादा (मुरली शर्मा) म्हणजे कपटी राजकारणी. प्रकाशदादांवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप होतात आणि आता राजीनामा द्यावा लागणार या भीतीने तो कट रचतो आणि त्या कटात शंकर गावडे गोवला जातो, प्रकाशदादांचा हा निष्ठावान कार्यकर्ता प्रकाशदादांना धडा शिकवितो.  दिग्दर्शक-पटकथा लेखक यांच्यातील समन्वय चांगला असावा हे बंदिस्त पटकथा आणि नेटक्या दिग्दर्शनामुळे सहजपणे लक्षात येते. कथानक नवीन नसले तरी त्याची आजच्या प्रेक्षकाला खिळवून ठेवणारी मांडणी आणि वेगवान करण्यात दिग्दर्शक चांगलाच यशस्वी ठरतो. वास्तविक संबध कथानक यापूर्वी प्रेक्षकांसमोर अनेक चित्रपटांतून आले आहे. थोडय़ाफार प्रमाणात पुढे काय होणार हेही प्रेक्षकाला समजते; परंतु तरीसुद्धा एकामागून एक घटनांची वेगवान पद्धतीने केलेली गुंफण, थेट भिडण्याची शैली यामुळे चित्रपट परिणामकारक ठरतो. पटकथा लेखन आणि प्रमुख भूमिका अशा दोन्ही भूमिकांमध्ये चिन्मय मांडलेकर आहे. बिनडोक निष्ठावान कार्यकर्ता, प्रकाशदादांनी हुकूम दिला की मागचा-पुढचा विचार न करता हुकमाचे पालन करण्याची वृत्ती आपल्या अभिनयातून चिन्मय मांडलेकरने उत्तम साकारली आहे. मुरली शर्माने राजकारणीसुद्धा चांगला साकारला आहे. शंकर गावडेच्या कार्यकर्ता सहकाऱ्यांनीही चित्रपटात धमाल केली आहे.  माहिती असलेला विषय चित्रपटात हाताळला असला तरी वेगवान कथानक आणि संगीत तसेच दमदार अभिनयाची जोड यामुळे प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.
अशोक भानुशाली प्रस्तुत
विजय असो!
निर्माते – चंद्रेश भानुशाली, एस. कोटियन, केतन शिशोदिया, छायालेखन व दिग्दर्शन – राहुल जाधव, पटकथा – चिन्मय मांडलेकर, विवेक गोरे, संगीत – अमित राज सावंत, संकलन -फैसल महाडिक, इम्रान महाडिक, कलावंत – गणेश यादव, अमिता खोपकर, चिन्मय मांडलेकर, मुरली शर्मा, नम्रता गायकवाड, केदार शिंदे, जनार्दन परब, रोहन गुजर, देवेंद्र भगत, मंगेश कवडे, विष्णू कोकणे, अजित सावंत, प्रियदर्शन जाधव, अविनाश ठाकूर, प्रतिभा जाधव, विपुल साळुंखे, समृद्धी जाधव व अन्य. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा