अमेरिकन गॉथिक हा साहित्यप्रकार एडगर अ‍ॅलन पो याच्या कथा-कादंबऱ्यांपासून मुख्य प्रवाहामध्ये रूढ झाला. ग्रॅण्ट वूड या चित्रकाराचे याच नावाचे एक चित्रही प्रचंड लोकप्रिय आहे. ज्यात हत्यारधारी शेतकरी आणि त्याची पत्नी आपल्या आवाढव्य शेतघराजवळ उभे राहिलेले दाखविण्यात आले आहेत. या चित्राचा प्रभाव आर्थिक मंदीच्या काळात इतका होता की भय आणि गुन्हे साहित्य लिहिणाऱ्या लेखकांच्या कथनसाहित्यामध्ये त्याचा वापर व्हायला लागला. जुन्या धाटणीचे आवाढव्य घर, शेततळे, काळ्या किंवा गडद पोशाखात वावरणाऱ्या गूढ व्यक्तिरेखा आणि त्यांच्या सुप्त-गुप्त मनसुब्यांच्या गोष्टी कथांमधून पुढे चित्रपटांमध्ये अवतरत गेल्या. गेल्या चारेक दशकांत नुसत्या या नावावरच कैक हॉरर, टॉर्चर आणि गुन्हे सिनेमा, टीव्ही मालिकांची निर्मिती झाली आहे. अमेरिकन गॉथिक या संकल्पनेत अमानवी कृत्य, भूतकल्पना अभिप्रेत असल्या तरी त्यात साहित्य आणि चित्रपटांमध्ये माणसांमधील अमानवीपणा, रासवटपणा आणि क्रौर्योत्सुक व्यक्तिरेखांचा समावेश झालेला आहे. भूत आणि थरार सिनेमांसारखाच पण थोडय़ा वेगळ्या असलेल्या या धाटणीच्या चित्रपटांमध्ये सैतानी प्रवृत्तींची माणसे आणि त्यांच्या एकमेकांवर न थांबणाऱ्या कारवायांवर भर असतो. जंगलामध्ये असलेल्या शेतघरामध्ये आसरा शोधणाऱ्या लोकांना त्या घरातील वृद्ध जोडपे बंधक बनवून असाहाय्य छळणूक करताना दाखविणारा १९८८ चा चित्रपट ग्रॅण्ट वुड या कलावंताचे चित्रच गोष्टीरूपात मांडणारा होता. नुकताच आलेला याच नावाचा दिग्दर्शक स्टुअर्ट कॉनेली अमेरिकी इंडिपेण्डण्ट चित्रपट या संकल्पनेला गेल्या तीसेक वर्षांतील चित्रपट-साहित्य प्रभावांना घेऊन तयार झाला आहे.

दहा वर्षांपूर्वी मायकेल हानेके या दिग्दर्शकाने आपल्या ‘फनी गेम्स’ या चित्रपटाची अमेरिकी आवृत्ती काढली होती. त्यात अर्थातच नावाप्रमाणे गमतीशीर काहीच नव्हते. एका आडभागातील अमेरिकी कुटुंबात शेजारी असल्याचा बनाव रचत दोन तरुण शिरतात. पुढे त्यांना त्यांच्याच घरामध्ये बंधक बनवून ती तरुण मुले हिंसा आणि क्रौर्याचे थैमान घालतात. ते करतानाही दोघे प्रेक्षकांशी म्हणजेच कॅमेऱ्याशीही वार्तालाप करतात. चित्रपटांमधील वाढत्या हिंसा आणि क्रौर्याला स्वीकारणाऱ्या प्रेक्षकांमधील नजरेबद्दल हा चित्रपट बऱ्याच गोष्टी सांगतो. फनी गेम्सचा संदर्भ इथे यासाठी की या चित्रपटाचे कथानक नव्वद अंशाने उलटे केल्यास अमेरिकन गॉथिक तयार होऊ शकेल. अमेरिकन गॉथिकला सुरुवात होते ती कैद्यांना शिक्षेसाठी घेऊन जाणाऱ्या मोठाल्या गाडीला अपघात होण्यातून. या अपघातात निक (स्लेट होमग्रन)आणि गी (मार्क बार्थमेअर) हे कैदी गाडीमधून पळ काढतात. जंगलाने वेढलेल्या त्या प्रदेशात त्यांना एक मोठाले घर दिसते. बांधलेल्या साखळीतून मुक्त होण्यासाठी त्या घरामध्ये ते आसरा घेऊ पाहतात. तेथे असलेल्या सारा (रॉचेल बॉस्ट्रम) आणि बिल (नेड ल्युक) यांना बंधक बनवतात. पुढे या कैद्यांना वाटते तितके त्या घरातून बाहेर पडणे सोपे राहात नाही, कारण थोडय़ाच वेळामध्ये दाम्पत्याला बंदी बनवणाऱ्या या दोघांची अवस्था पालटते. अतिशय ठरवून तयार केलेल्या जाळ्यामध्ये आपण अडकल्याचे निक आणि गी यांना लक्षात यायला लागते. वृद्ध जोडपे त्यांचे बंदिस्त घरात आतोनात हाल करू लागतात. निकला तळघरामध्ये कॅटरिना नावाची मुलगी बंदिस्त असल्याचे समजते. तो तिला तेथून न सोडविता निव्वळ आपल्या बचावाचे मार्ग शोधण्यास निघतो. पण गोष्टी आणखी बिकट होतात. दाम्पत्याचे क्रौर्य अधिक तीव्र रूप धारण करते आणि रहस्य नव्याने उलगडायला लागते.

आत्यंतिक वेगाने चालणाऱ्या या चित्रपटाचे कथानक फार वेगवान असले, तरी कलाकारांचे चेहरे अगदीच नवे आहेत. हॉलीवूडच्या मुख्य धारेतील कलाकारांना घेऊन हा चित्रपट निघता, तर वर्षांतल्या ब्लॉकबस्टरमध्ये त्याची नोंद व्हायला अडचण नव्हती. पण तरीही या कलाकारांनी वठवलेल्या भूमिका त्यातील कथा परिणामकारकरीत्या घडविण्याच्या आड येत नाहीत. हानेके यांनी तयार केलेला फनी गेम्स आणि याचा तोंडवळा उलटा असला, तरी हिंसेच्या मानसिक पातळीचा धांडोळा घेण्याचा इथला प्रयत्न सारखा आहे. मूळ साहित्य आणि कलेतून आलेल्या अमेरिकन गॉथिक या संकल्पनेला हा चित्रपट फार थोर नसूनही कसा वापरतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अमेरिकी सिनेमातील वाढत्या हिंसोत्सवाचे हा चित्रपट प्रातिनिधिक उदाहरण आहे. एखाद्या लघुकथेच्या आस्वादासारखा त्याचा अनुभव एकदा घ्यायला हरकत नाही.