महान भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारीत राकेश ओमप्रकाश मेहरांच्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाने केवळ भारतातच धूम माजवली नसून, भारताबाहेर देखील या चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. सोमवाच्या संध्याकाळी मिल्खा सिंग यांना अमेरिकेचा महान धावपटू कार्ल लुईसचा दूरध्वनी आला. मिल्खा सिंग यांच्यासाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. लुईसने हा चित्रपट पाहिला असून, चित्रपट पाहून तो खूप भारावून गेला.
चित्रपटाशी संबंधीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ल लुईसने हा चित्रपट अमेरिकेत पाहिला. आपापल्या देशात सुपरस्टार असलेल्या या दोन महान खेळाडूंनी याआधी एकमेकांशी संवाद साधला नव्हता. कार्लने मिल्खा सिंग यांचा चंदिगडमधील नंबर मिळवून त्यांना दूरध्वनी केला. मिल्खा सिंगसाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. कार्लने केलेल्या कौतुकाने मिल्खा सिंग खूप भावूक झाले.
या घटनेला दुजोरा देत राकेश ओमप्रकाश मेहरा म्हणाले, होय, कार्लने चित्रपट पाहिल्यावर मिल्खा सिंगना दूरध्वनी केला होता. मिल्खा सिंग यांचा जीवनपट सर्वांना प्रेरणा देणारा ठरेल अशी आम्हाला आशा होती. परंतु, या चित्रपटाचा प्रभाव एव्हढ्या दूरवर पसरेल, असे वाटले नव्हते.
चित्रपटाचे सह-निर्माते अजित अधारे म्हणाले, हा केवळ चित्रपट नसून, ही एक चळवळ आहे. मनोरंजनापलीकडे नेणारे चित्रपट आपल्याला फार क्वचितच पाहायला मिळतात. पालकांबरोबर आणि मुलांबरोबर पाहावे आणि ज्यामुळे भारतीयत्वाचा अभिमान वाटवा, असे किती चित्रपट आज-काल बनतात? ‘लगान’ आणि ‘रंग दे बसन्ती’ चित्रपटांनंतर ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपट अशा प्रकारचा प्रभाव निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा