बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या टीकेचे धनी ठरले आहेत. त्यांनी मुलींची साक्षरता आणि प्रजनन दर यांचा संबंध जोडून केलेल्या या विधानावर पंतप्रधान मोदींनीही नाराजी व्यक्त केली होती. इतकंच नाही तर आता आफ्रिकन-अमेरिकी गायिका मेरी मिलबेन हिनेही नितेश कुमार यांच्या विधानावर आक्षेप नोंदवत जोरदार टीका केली.

गायिका मेरी मिलबेनने यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदींना व त्यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. नितीश कुमारांच्या या विधानानंतर तिने व्हिडीओ शेअर करत भाजपाला बिहारमध्ये नेतृत्व करण्यासाठी एका महिलेला सक्षम करण्यास सांगितलं.

VIDEO: महिलांबाबत केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर माफी मागत नितीश कुमार म्हणाले…

काय म्हणाले होते नितीश कुमार?

“लग्नानंतर पुरुष रोज रात्री पत्नीशी लैंगिक संबंध ठेवतात, त्यामुळे मूल जन्माला येते. परंतु, मुली साक्षर असतील तर प्रजनन दर घसरतो. मुलगी सुशिक्षित असेल तर प्रजनन दर सरासरी दोन टक्क्यांपर्यंत खाली येतो. जर तिने शालेय शिक्षण पूर्ण केले असेल तर प्रजनन दर राष्ट्रीय स्तरावर १.७ टक्क्यांपर्यंत खाली येतो,” असं ते म्हणाले. पण नितीश कुमार यांनी मुलींची साक्षरता आणि प्रजनन दर यांचा संबंध जोडताना वापरलेली भाषा आक्षेपार्ह होती.

लोकसंख्या नियंत्रणावर बोलताना नितीश कुमारांची जीभ घसरली, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; विरोधकांकडून हल्लाबोल

मेरी मिलबेनने केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक

मेरी मिलबेन म्हणाली, “जगभरात, अमेरिकेत आणि भारतात २०२४ च्या निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे. निवडणुका बदलाची संधी देतात, कालबाह्य धोरणे आणि अप्रगत लोकांच्या जागी अशा लोकांना संधी दिली जाते, जे प्रेरणा देतात. बरेच लोक मला विचारतात की मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक का करते. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक स्तरावर माझे भारत आणि भारतीय लोकांवर प्रेम आहे. माझा विश्वास आहे की पंतप्रधान मोदी हे भारताच्या आणि भारतीय नागरिकांच्या प्रगतीसाठी सर्वोत्तम नेते आहेत. जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत.”

“त्यांना शरम वाटत नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींची नितीश कुमारांवर टीका, इंडिया आघाडीवरही हल्लाबोल

मेरी मिलबेनची नितीश कुमारांवर टीका

मेरी मिलबेन म्हणाली, “आज भारताला एका निर्णायक क्षणाचा सामना करावा लागत आहे. बिहारमध्ये महिलांच्या मूल्यांना आव्हान दिले जात आहे. मला विश्वास आहे की या आव्हानाला एकच उत्तर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर मला वाटतं की एका धाडसी महिलेने पुढे येऊन बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी तिची उमेदवारी जाहीर केली पाहिजे.”

ती पुढे म्हणाली, “मी भारतीय असते तर मी बिहारमध्ये जाऊन मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढवली असती. मला वाटतं की नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याची वेळ आली आहे. बिहारमध्ये नेतृत्व करण्यासाठी भाजपने महिलांना सक्षम केले पाहिजे, असे माझे मत आहे. महिला सक्षमीकरण आणि विकासाची खरी भावना असेल. बिहारच्या लोकांमध्ये, भारतातील लोकांमध्ये स्त्रीला मत देण्याची शक्ती, मतदान करण्याची शक्ती आणि अशा काळात बदल घडवण्याची शक्ती आहे.”

Story img Loader