अमेरिकन गायिका सेलेना गोमेझ हिचे नाव आज जगभरात प्रसिद्ध असलेल्या गायकांच्या यादीत सामील आहे. भारतातही तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहत ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबद्दल चाहत्यांना माहिती देत असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असलेलीही पहायला मिळते. आता सेलेनाने एक वेगळाच इतिहास रचला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सेलेनाचे ४०० मिलियन (दशलक्ष) फॉलोअर्स झाले आहेत. इंस्टाग्रामवर इतके फॉलोअर्स मिळवणारी ती पहिली महिला आहे. यापूर्वी काइली जेनर ही इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो मिळवणारी महिला ठरली होती. तिने रचलेला या इतिहासाचं सगळीकडून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते तिचं अभिनंदन करत आहेत.
सेलेना गेल्या काही दिवसांपासून ‘द चेन्समोकर्स’ स्टार ड्रू टॅगगार्टबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आहे. द मिररने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये सांगितले की, हे जोडपे त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलण्यास घाबरत नाही. सेलेना गोमेझ आणि ड्रू टॅगगार्ट अनेकदा एकत्र दिसले आहेत. दोघेही डेट नाईटला जाताना दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर दिसल्यानंतर सेलेनाला तिच्या लठ्ठपणामुळे काही लोकांनी ट्रोल केले होते.
सेलेना गोमेझने टीव्ही मालिका ‘विझार्ड्स ऑफ वेव्हरली प्लेस’मध्ये प्रथम बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर ती संगीतविश्वात आली आणि तिला प्रचंड यश मिळाले. सेलेनाने ‘कम अँड गेट इट’, ‘गुड फॉर यू’ आणि ‘लूज यू लव्ह मी’ यासह अनेक चार्ट टॉप अल्बम आणि वेगवेगळे सिंगल्स ट्रॅक सादर केले आहेत. अभिनेत्री आणि गायिकेबरोबरच सेलेना एक निर्मातीसुद्धा आहे. तिचा स्वतःचा ब्युटी ब्रँडही आहे.