– ‘आम्ही दोघे राजा राणी’ मालिका धमाल वळणावर
– स्टार प्रवाह कुटुंबातील सदस्यांच्या परफॉर्मन्सने होणार लग्नाचा ग्रॅण्ड सोहळा
खरे मुंबईकर नाईक आणि अस्सल पुणेकर लेले कुटुंबिय यांच्या लग्नाचा बॅण्ड १७ फेब्रुवारीपासून वाजणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘आम्ही दोघे राजा राणी’ या मालिकेतील पार्थ आणि मधुराच्या विवाह सोहळ्याचं ‘ग्रँड सेलिब्रेशन’ होणार असून, स्टार प्रवाह कुटुंबातील कलाकारही या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
मुंबईकर आणि पुणेकर यांच्यातील धमाल टशन ‘आम्ही दोघे राजा राणी’ या मालिकेत पहायला मिळत आहे. पार्थने त्याच्या आजीची आणि मधुराने तिच्या बाबांची समजूत काढल्यानंतर या दोघांना लग्नाची परवानगी मिळाली आहे. मात्र, मधुराच्या कंजूस वडिलांनी लग्नाच्या खर्चाची जबाबदारी नाईक कुटुंबियांवरच टाकली आहे. आजीला अजूनही मधुरापेक्षा तनुश्रीच म्हणजेच पार्थची बॉस जास्त पसंत आहे. हळद आणि संगीत कार्यक्रमात तनुश्रीही उपस्थित असते. हळदीच्या कार्यक्रमात तनुश्रीच हळद लावून घेते. मधुराची अंगठी सुद्धा ती गायब करते आणि गोंधळ होतो. पण लग्न दणक्यात पार पडते.या लग्नासाठी स्टार प्रवाहच्या नकुशी, गोठ, पुढचं पाऊल, दुहेरी, लेक माझी लाडकी या मालिकांमधील लोकप्रिय कलाकार हजेरी लावणार आहेत. तसेच लग्नाच्या सोहळ्यात त्यांचे परफॉर्मन्सही होणार असल्याने हा लग्न सोहळा अधिकच ग्रँड होणार आहे. ‘आम्ही दोघे राजा राणी’ या मालिकेतील हा ग्रँड विवाह सोहळा १७ फेब्रुवारीपासून रात्री ८ वाजता पहायला मिळेल.
लग्नानंतर मुलगी मुलाच्या घरी रहायला जाते. मात्र, या मालिकेत खरी धमाल पार्थ आणि मधुराचं लग्न झाल्यानंतर येणार आहे. कारण, लग्नानंतर मधुरासह तिच्या घरचे तिच्या सासरी, म्हणजे नाईकांकडे रहायला जाणार आहेत. लेले कुटुंबिय नाईकांच्या घरी रहायला गेल्यानंतर काय मजा येते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.