२३ वर्षांचा सुखी, समाधानी संसार झाल्यानंतर नवरा आकस्मिक हृदयविकाराच्या झटक्यानं गेल्यावर कुमुदला जबर धक्का बसणं स्वाभाविकच. तशात या धक्क्य़ातून सावरण्याआधीच तिला आणखीन एक धक्का बसतो : आपल्या नवऱ्याची एक प्रेयसी असल्याचं तिला कळतं, तेव्हा! तिचंही नाव ‘कुमुद’च असतं! जिच्यावर निरतिशय प्रेम केलं, अतूट विश्वासानं ज्या व्यक्तीचा इतकी र्वष आपण निगुतीनं संसार केला, ती व्यक्ती आपली नव्हतीच? मग एवढी र्वष प्रभाकर आपल्यावर प्रेम असल्याचं फक्त नाटक करत होता? आपल्याबद्दल वेळप्रसंगी व्यक्त होणारी त्याची काळजी, आत्मीयता.. सगळं खोटं होतं? त्याच्या आयुष्यात कुणी दुसरीच ‘कुमुद’ होती; जिच्या आठवणीखातर त्यानं आपलंही नाव ‘कुमुद’ ठेवावं? भयंकर! असह्य़ होतंय हे सारं! इतकी र्वष आपण निव्वळ भ्रमात जगलो. आपला नवरा केवळ आपलाच आहे, या भ्रमात!
कोण आहे ही कुमुद? प्रभाकरचं आणि तिचं नातं काय? आणि इतक्या वर्षांत आपल्याला नवऱ्याच्या या विश्वासघाताची साधी शंकाही येऊ नये? इतके कसे आपण बावळट! पण मग प्रभाकर कधी ‘ती’च्याकडे गेल्याचं आपल्याला कसं कळलं नाही? तो गेल्यानंतर त्यानं तिला लिहिलेली पत्रं (जी त्यानं कधीच तिला पाठवली नाहीत! का नाही पाठवली?) सापडल्यावर  आपल्याला हे कळावं? कुठे राहते ही कुमुद? काय करते? प्रभाकरचे आणि तिचे नेमके कशा प्रकारचे संबंध होते? ही त्याची लग्नाआधीची प्रेयसी की नंतरची?.. एक ना दोन.. असंख्य प्रश्नांचे भुंगे कुमुदला कुरतडत राहतात. जाब विचारायला आता प्रभाकरही नाहीए.
हं. एक व्यक्ती आहे : कुमुद! या सगळ्या प्रकरणावर प्रकाश टाकू शकणारी! तिला भेटायचं? आपल्या सवतीला? जिच्यामुळे इतक्या वर्षांचा आपला संसार मातीमोल ठरला त्या बाईला? जिचं तोंडही पाहू नयेसं वाटतं त्या आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीला भेटायचं?
दुसरा मार्ग तरी काय आहे.. वस्तुस्थिती कळण्याचा? आता तिलाच जाब विचारायला हवा.  
कुमुद आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीला- कुमुदला भेटायला तिच्या घरी जाते तर दारावर पाटी : सौ. कुमुद प्रभाकर आपटे! आणखी एक जबर धक्का! म्हणजे? म्हणजे प्रभाकरने हिच्याशी लग्न केलं होतं? आणि एकाच वेळी तो आम्हा दोघींशी संसार करत होता? भयंकर!
कुमुदच्या तळपायाची आग मस्तकात जाते, वर ‘ती’ तिचं हसत हसत स्वागत करते. आपण कशासाठी आलो आहोत आणि कोण आहोत, हे सांगूनही तिला फरक पडत नाही म्हटल्यावर कुमुद तिला सणसणीत शिवी घालते आणि एक मुस्कटात ठेवून देते. क्षणभर ती सटपटते. पण क्षणभरच..! पुन्हा स्वत:ला सावरून कुमुदशी ती नॉर्मल स्वरात बोलू लागते. किती निर्लज्ज बाई आहे ही! कुमुदला शिसारी येते. त्या घरात एक क्षणभरही थांबू नयेसं तिला वाटतं. ती जायला निघते.
पण..
पण ज्यासाठी आलो होतो ते काम तिला आठवतं. आपण असे चरफडून निघून गेलो तर प्रभाकर आणि तिचं नेमकं नातं काय? कुठं भेटले ते एकमेकांना? तिला प्रभाकरचं आपल्याशी लग्न झालेलं माहीत होतं का? तरीही तिनं त्याला का जवळ केलं असावं?.. अशा असंख्य प्रश्नांची अनुत्तरित भाऊगर्दी सतत छळत राहणार आणि आपलं पुढचं आयुष्य वैराण वाळवंट. किमान त्यांची खरी उत्तरं जाणून घेतली तर निदान कुणावर दोषारोप करून मनातल्या घुसमटीचा क्षणिक निचरा तरी होईल. अर्थात दारावरच्या पाटीनं सगळंच स्पष्ट केलंय म्हणा. तरीही.. सुरुवातीच्या त्या अवघडल्या क्षणांनंतर त्यांच्यात तुटक का होईना, संवाद सुरू होतो. कुमुद तिला वाक्यागणिक चाबकाचे फटकारे ओढीत असली तरी ‘ती’ मात्र शक्य तितक्या शांतपणे तिच्या प्रश्नांची उत्तरं देते. तिच्या या अभंग शांतीचीच मग कुमुदला तिडीक येते. पण..
त्यांचा ‘संवाद’ सुरू राहतो..
कुमुदचं समाधान होईतोपर्यंत!
वीरेंद्र प्रधान लिखित-दिग्दर्शित ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’ हे नाटक आजच्या ‘मुक्त’ स्त्रीचं आणि चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या स्त्रीचंही भावविश्व उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करतं. आपण लौकिकार्थाने कितीही ‘आधुनिक’ झालो असलो तरीही मानवी नातेसंबंधांतील पेचांकडे पाहण्याची आपली मानसिकता मात्र बदललेली नाही, याकडे हे नाटक निर्देश करते. याचं कारण मग आपल्यावरचे शेकडो, हजारो वर्षांचे चालत आलेले संस्कार असोत किंवा मूलभूत मानवी प्रवृत्ती असो- त्यांचे म्हणून काही ‘उसूल’ आहेत, जे या नाटकात प्रतिबिंबित झालेले दिसतात. लेखक वीरेंद्र प्रधान यांनी एकाच व्यक्तीत सर्वस्वानं गुंतलेल्या दोन स्त्रियांची भावनिक, मानसिक आंदोलनं तरलतेनं टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न यात केलेला आहे. ‘एक्पांड द रिअॅलिटी ऑर लोअर युवर एक्स्पेक्टेशन’ हाच ‘सुखी’ होण्याचा मार्ग आहे, हे या दोन स्त्रियांच्या जगण्यातून त्यांनी विशद केलं आहे. पण बुद्धीला जरी हे पटलं, तरी मनाला पटायला हवं ना? म्हणूनच या स्त्रिया वरकरणी आपण सुखी आयुष्य जगत असल्याचं म्हणत असल्या तरी ती वस्तुस्थिती होती/आहे का, हा प्रश्नच आहे.
‘सुखात माणूस सुखी होतोच, पण एखाद्याच्या दु:खातही त्याला सुख मिळतं.’ हे लेखकाचं निरीक्षणही शंभर टक्के बरोबर आहे. म्हणूनच आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीला त्याच्यापासून मूल झालेलं नाही, हे कळल्यावर कुमुदला बरं वाटतं. आपले आणि प्रभाकरचे ‘तसले’ संबंध नव्हते, असं कुमुदनं सांगितल्यावर तिच्या मनावरचं मणमणाचं ओझं उतरतं. लेखकानं एक ‘टिपिकल’ बायको आणि एक वरपांगी ‘मुक्त’ स्त्री यांच्या भावविश्वात घडणाऱ्या मुक्या, विलोल हालचाली टिपण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न या नाटकात केला आहे. परंतु का कुणास ठाऊक, त्यांच्या या प्रयत्नांत मालिकांचा प्रभाव दृश्य-अदृश्यपणे सतत जाणवत राहतो. त्यातली धक्कातंत्रे, चटपटीत टाळीबाज संवाद आणि लावलेली लांबण हे दोष नाटकाची ‘खोली’ उणावतात. दिग्दर्शक म्हणून लेखकाच्या संहितेची तटस्थपणे चिरफाड करण्याचं, विश्लेषण करण्याचं आणि ती दुरुस्त करून घेण्याचं वीरेंद्र प्रधान विसरलेले दिसतात. म्हणूनच यातले अनेक प्रसंग बेतल्यासारखे किंवा लेखकाच्या सोयीनं रचल्यासारखे वाटतात. ते अपरिहार्य, विश्वसनीय वाटत नाहीत. प्रभाकरच्या बायकोचा नात्यांच्या शहाणीवेकडचा प्रवास सहज स्वाभाविक न वाटता लेखकानं तो घडवल्यासारखा वाटतो. अशा तऱ्हेनं नाटकात लेखक ‘दिसणं’ हे खचितच चांगलं लक्षण नव्हे! नाटकाच्ां विकसनही सहज, स्वाभाविकरीत्या घडलेलं नाहीये. सध्या समांतर रंगभूमीवर साधारणत: याच विषयावरचं सुषमा देशपांडे यांचं ‘प्रकरण पहिले’ हे नाटक सुरू आहे. त्यात प्रेयसीच्या दृष्टिकोनातून या त्रिकोणाकडे पाहिलं गेलं आहे. आशयदृष्टय़ा ते अधिक सखोल आहे. दिग्दर्शक म्हणून वीरेंद्र प्रधान यांना शेजारच्या ‘देसाई’ या पात्राचं नाटकातलं प्रयोजन खरंतर खुपायला हवं होतं. या अदृश्य पात्रामुळे नाटकात कोणतीच लक्षणीय भर पडत नाही. नाटकाचा शेवट मात्र ज्या नोटवर झाला आहे, त्यामुळे नाटक पुन्हा रुळावर येतं, हे मान्य करायला हवं.
प्रदीप मुळये यांनी नेपथ्य व प्रकाशयोजनेतून नाटकाला अपेक्षित ‘टेक्श्चर’ दिलं आहे.
सौमित्र यांच्या कविता नाटक पुढं नेतात. मिथिलेश पाटणकर यांनीही पाश्र्वसंगीतातून नाटय़ांतर्गत भावप्रक्षोभाला उठाव दिला आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी ‘सौ. कुमुद’ची घुसमट, त्रागा, तडफड आणि आपल्या नवऱ्याच्या संबंधांबद्दल जाणून घेण्यातली असोशी अत्यंत उत्कटतेनं व्यक्त केली आहे. त्यातलं संयमितपण, त्यांची ‘टिपिकल बायको’ वृत्ती, मानसिकता आणि आपल्या नवऱ्याचे त्याच्या प्रेयसीशी ‘तसले’ संबंध नसल्याची खात्री पटल्यावर सोडलेला सुटकेचा नि:श्वास अव्यक्तातून बरंच काही बोलून जातो. प्रतीक्षा लोणकर यांची कुमुद वरकरणी बेफिकीर, भावनाहीन वाटत असली तरी मध्येच झालेला तिचा उद्रेक तिची भळभळती जखम उघडी करून जातो. आपल्या महत्त्वाकांक्षामुळे, करिअरिस्ट होण्यानं आपण नेमकं काय गमावलं याची नंतर झालेली विद्ध जाणीव त्यांनी कुमुदकडे कबूल करतानाची त्यांची घायाळ नजर त्यापलीकडचंही बरंच काही व्यक्त करते. आणि शेवटाकडे राणीशी (मुलीशी) फोनवरून बोलताना त्यांच्या ठायी असलेली एक प्रगल्भ समृद्ध मनाची स्त्री आपसूकच उलगडत जाते. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या मनातही त्यांचा ‘उथळ ते परिपक्व स्त्री’ हा प्रवास एका ठाय लयीत घडत जातो..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा