रंगीबेरंगी गुलालाची उधळण, सगळीकडे मोठमोठे नगारे, डफली अशा वाद्यांच्या प्रतिकृती आणि या पाश्र्वभूमीवर तितक्याच रंगीबेरंगी कपडय़ात ‘नैनों मे सपना, सपनों मे सजना..’ म्हणत नाचणारी श्रीदेवी आणि जितेंद्र. ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातील ‘नैनों मे सपना’ हे गाणे विसरू म्हणता विसरले जाणार नाही. आज इतक्या वर्षांनंतरही हे गाणे ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाची ओळख आहे. आणि म्हणूनच या चित्रपटाच्या रिमेकमध्येही या गाण्याचे स्थान पक्के आहे. मूळ गाणे किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात होते आता रिमेकमध्ये किशोरकुमार यांचे सुपुत्र अमितकुमार यांच्या आवाजात या गाण्याची जादू अनुभवायला मिळणार आहे.
आम्हाला ‘नैनो मे सपना’ या गाण्याची जादू रिमेक चित्रपटातही टिकवायची होती. मूळ गाणे किशोर कुमार यांनी गायले होते त्यामुळे त्या गाण्याला तेवढा न्याय देऊ शकेल, अशा योग्यतेचा गायक आम्हाला हवा होता. आणि अमितकुमारशिवाय दुसऱ्या कोणी हे गाणे तितकेच चांगले गाऊ शकेल, असे मला अजिबात वाटत नव्हते. अमितकुमार यांचा आवाज खूपच चांगला आहे. आणि त्यांनी अगदी किशोरजींनी जसे गाणे गायले होते त्याचप्रमाणे हे गाणे गायले आहे, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांनी दिली.
अमितकुमार आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात ‘नैनों मे सपना’ नव्याने ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. ‘हिम्मतवाला’ चित्रपटाचे आणि त्यातील गाण्यांचे हक्कही निर्मात्यांनी घेतले असल्याने या गाण्यात काही बदल करणेही त्यांना शक्य झाले आहे. संगीतकार साजिद-वाजिद यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.
जितेंद्र आणि श्रीदेवी ही जोडी या चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रिय झाली होती. आता नव्या ‘हिम्मतवाला’मध्ये जितेंद्रची भूमिका अजय देवगण करतो आहे तर श्रीदेवीच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाची निवड झाली आहे. ‘नैनो मे सपना’ हे गाणे आधी इतकेच लोकप्रिय झाले तर प्रेक्षकांना त्या गाण्याची जादू पुन्हा अनुभवता येईल, असा विश्वास साजिदला वाटतो आहे.    

Story img Loader