मिमिक्री आर्टिस्ट, गायक सुदेश भोसले आणि बॉलीवूडचे ‘बीग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांचे अतूट असे नाते आहे. अमिताभ बच्चन यांची ‘मिमिक्री’करता करता सुदेश भोसले यांचा आवाज अमिताभ बच्चन यांचा आवाज झाला. अमिताभ यांच्याशी असलेल्या या अतूट नात्याला भोसले यांनी एका आगळ्या कार्यक्रमातून व्यक्त केले आहे. ‘अमिताभ और मै’ हा नवा कार्यक्रम सुदेश भोसले यांनी तयार केला असून त्याचा मुंबईतील पहिला प्रयोग शुक्रवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात पार पडला. दुसरा प्रयोग २० जून रोजी रवींद्र नाटय़ मंदिरातच होणार आहे.
कामाक्षी आर्ट आणि मेलडी मेकर्स यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात सुदेश भोसले यांच्यासोबत त्यांचा मुलगा सिद्धांतही आहे. सिद्धांत स्वत: गातो आणि गीटारवादक आहे. अमिताभ बच्चन यांच्या विविध चित्रपटांतील त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेली सुपरहिट गाणी, अमिताभ यांनी गायलेली आणि लोकप्रिय झालेली गाणी, अमिताभ यांचे गाजलेले काही संवाद असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. दोन ते अडीच तासांच्या या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांची २५ हिट गाणी सुदेश भोसले आणि सिद्धांत सादर करतात. व्यासपीठावर मागे उभारलेल्या मोठय़ा पडद्यावर अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील ही गाणी, प्रसंग त्याच वेळी दाखविण्यात येतात.
‘अमिताभ और मैं’ या कार्यक्रमाविषयी ‘रविवार वृत्तान्त’ला अधिक माहिती देताना सुदेश भोसले म्हणाले, गेली ३३ वर्षे मी मिमिक्री आर्टिस्ट, गायक म्हणून काम करतो आहे. भारतात तसेच परदेशातही मी आजवर अनेक कार्यक्रम केले आहेत. अमिताभ यांच्या आवाजाची नक्कल तर गेली अनेक वर्षे करतो आहे. काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमधील विविध कलाकार, गायक अशा १४ जणांच्या आवाजात मी ‘ट्रिब्युट टू लिजंड’ हा कार्यक्रम सादर केला होता. अमिताभ हे माझे दैवत आहेत. त्यांच्यासाठी म्हणून तसेच अमिताभ यांचे चाहते व प्रेक्षकांना काहीतरी वेगळे द्यावे या उद्देशाने हा कार्यक्रम सादर करण्याचे ठरविले आहे. दर महिन्याला किमान एक कार्यक्रम करायचा असा विचार आहे.
हा कार्यक्रम तयार केल्यानंतर अमिताभ यांच्याशी संपर्क साधून आपण तुमच्यावर एक कार्यक्रम करत असल्याची कल्पना त्यांना दिली होती. त्यांनाही कार्यक्रमाची संकल्पना आवडली. मुंबईतील आगामी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे त्यांनी मान्य केले आहे. कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांचे विविध मुड्स टिपणारी गाणी सादर करण्यात येत असून या सर्व गाण्यांच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांचे एक वेगळे रूप अमिताभ यांच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांनाही पाहायला मिळेल, असा विश्वासही सुदेश भोसले यांनी व्यक्त केला.
सुदेश भोसले म्हणतात, ‘अमिताभ और मैं’!
मिमिक्री आर्टिस्ट, गायक सुदेश भोसले आणि बॉलीवूडचे ‘बीग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांचे अतूट असे नाते आहे.
First published on: 12-05-2015 at 06:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh aur mai sudesh bhosale