नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या हिंदी चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरु आहे. यामध्ये अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग नागपूरमध्ये सुरु असून अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटाची टीम सध्या येथील पांजरा कोराडी येथे या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी एका निवृत्त क्रीडा शिक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अमली पदार्थांना बळी गेलेल्या एका मुलाचं आयुष्य फुटबॉल या खेळामुळे कसं सुधारतं हे चित्रपटाद्वारे दाखवण्यात येणार आहे. नागपुरातील मोहननगर इथल्या सेंट जॉन स्कूलमध्ये सेट उभारण्यात आला आहे.अमिताभ मोठे अभिनेते असले तरीही ते सामान्यांमध्ये सहज वावरताना दिसतात. अशीच त्यांची एक छबी नुकतीच पाहायला मिळाली आहे.
नागपूरमधील पांजरा कोराडी येथे राहणाऱ्या आपले विद्या मंदीर येथील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या एका शिक्षकांच्या घरी निवांत क्षणी दिसून आले. चोबीतकर असे या प्राध्यापकांचे नाव असून चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्यांच्या घराचा वापर केला जात आहे. साध्याशा वाटणाऱ्या या घरात अमिताभ अतिशय सहजपणे वावरताना दिसत आहेत. या शूटिंगदरम्यानचे काही फोटो अमिताभ यांनी स्वत: शेअर केले होते. या चित्रपटासाठी मंजुळे यांनी निवडलेल्या मुलांना रीतसर अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात आले असून ते आता एखाद्या नटासारखे काम करणार आहेत.
नागराज यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरणार असून या पहिल्या हिंदी चित्रपटात त्यांना त्यांच्या आवडत्या कलाकार खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करता येणार आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले असल्याने झुंडबद्दल लोकांच्या मनातील उत्सुकता वाढली आहे. बिग बींची एक झलक पाहण्यासाठी नागपूरच्या विमानतळावर तसेच ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये आणि लॉबीमध्ये चाहत्यांची गर्दी होत आहे.
शूटिंगसाठी सुरुवातीला पुण्यात सेट तयार करण्यात आला होता. पण काही कारणास्तव चित्रीकरण थांबवावं लागलं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातून काढता पाय घेतल्याची चर्चा होती. निर्मात्यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर बिग बींनी होकार कळवला. या सर्व अडचणींनंतर अखेर ‘झुंड’चं शूटिंग सुरू झाली आहे. नागपुरातील मोहननगर इथल्या सेंट जॉन स्कूलमध्ये सेट उभारण्यात आला आहे.