बॉलिवूडमध्ये सध्या एकोचवेळी कलाकारांच्या तीन पिढय़ा कार्यरत आहेत हे लक्षात घेतले तर या तिन्ही पिढय़ांमध्ये ‘ट्विटर’वरून सर्वाधिक चाहत्यांशी संवाद साधण्यात ‘महानायक’ अमिताभ बच्चन आघाडीवर आहेत. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन सर्वेक्षणातून अमिताभ बच्चन यांचे ‘ट्विटर’वर सर्वाधिक चाहते असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यापाठोपाठ शाहरूख, सलमान आणि आमिर अशा तिन्ही खानांचे ‘ट्विटर’वर वर्चस्व आहे.
‘ट्विटर’ आणि ब्लॉग तसेच इतर संकेतस्थळावरून अमिताभ बच्चन रोजच्या रोज आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. त्यामुळे गेल्यावर्षीही ‘ट्विटर’वर त्यांच्याच चाहत्यांची संख्या जास्त होती आणि या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा ८७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे ‘टु द न्यू’ या डिजिटल सेवा पुरवणाऱ्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ शाहरूख, सलमान आणि आमिरचा क्रमांक लागतो. सर्वाधिक ‘ट्विटर’ चाहते असणाऱ्या पहिल्या पाच कलाकारांच्या यादीत सध्या एकाच अभिनेत्रीचे नाव झळकते आहे ते म्हणजे प्रियांका चोप्राचे. प्रियांका या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
‘टु द न्यू’ने केलेल्या संशोधनानुसार अनेक बॉलिवूड कलाकार हे आपल्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी ‘ट्विटर’चा वापर करतात. तर काही कलाकार हे आपले वैयक्तिक अनुभव, भावभावना आपल्या चाहत्यांकडे व्यक्त करण्यासाठी या माध्यमांचा वापर करतात. ब्लॉग आणि ‘ट्विटर’च्या माध्यमातून आपले रोजचे अनुभव सांगण्यात अमिताभ बच्चन आजही आपल्या सहकलाकारांपेक्षा सर्वात पुढे आहेत. मात्र, आमिर खानच्या बाबतीत एक वेगळीच माहिती या संशोधनातून पुढे आली आहे. आमिर मुळातच ‘ट्विटर’वर फार सक्रिय नाही. किंबहुना, या वर्षभरात आमिरने स्वत:हून केवळ दोनदाच ट्विट केले होते. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांच्या भेटीविषयी एकदा आमिरने ट्विट केले होते. त्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याने ट्विट केले होते. आणि तरीही त्याच्या चाहत्यांची संख्या गेल्या दोन महिन्यांत दोन लाखांनी वाढली आहे.
‘टु द न्यू’चे व्यवस्थापकीय संचालक पुनीत जोहर यांच्या मते, ‘ट्विटर’सारख्या ऑनलाइन माध्यमांनी सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यात असलेली मोठी दुरी मिटवली आहे. अन्यथा कधीही आपल्या आवडत्या कलाकारांशी संवाद साधता येईल, अशी कल्पनाही करणे धाष्टर्य़ाचे ठरले असते. त्यामुळेच ‘ट्विटर’वर कलाकारांना कोटय़वधी चाहते रोजच्या रोज भेटत असल्याचे जोहर यांनी सांगितले.

Story img Loader