हिंदी चित्रपटातील ‘अभिनयाचा बादशहा’ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या चरित्राचे प्रकाशन पुढच्या महिन्यात अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला दिलीप कुमार, त्यांची पत्नी सायरा बानो आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर उपस्थित राहणार आहेत.
दिलीप कुमार यांचे निकटवर्ती असलेल्या उदय तारा नायर यांनी त्यांचे चरित्राचे लेखन केले असून ‘सबस्टन्स अँड श्ॉडो’ नावाने हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. गेल्यावर्षी दिलीप कुमार यांच्या ९१ व्या वाढदिवसाचे निमित्त साधून हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार होते. मात्र, काही कारणास्तव ते त्यावेळी प्रकाशित होऊ शकले नव्हते. त्यामुळे ९ जून रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मोहम्मद युसूफ खान नावाचा हा तरुण हिंदी चित्रपटसृष्टी प्रवेश करताना दिलीप कुमार झाला. आपल्या अभिनयाने सहा दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या दिलीप कुमार यांना १९९१ साली ‘पद्मभूषण’ किताब देऊन सन्मानित करण्यात आले तर १९९४ साली त्यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाला होता़