प्रौढ व सज्ञान व्यक्तींमधील परस्परसंमतीने असलेले समलैंगिक संबंध वैध ठरवणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा २००९ मधील निर्णय रद्दबातल ठरवत ‘समलिंगी संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हाच असून, त्यासाठी जन्मठेपेची तरतूद कायम आहे,’ असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. आमिर खान आणि सेलिना जेटलीसारख्या बॉलिवूड कलाकारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली असताना, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र संदिग्ध भूमिका घेतली आहे.
याविषयावर आपल्या ब्लॉगवर ते लिहितात, समलैंगिकतेबाबतच्या सर्वोच्च न्यालयाच्या निकालावर मोठ्या प्रमाणावर वाद आणि चर्चा होते आहे. काही ठाम दृष्टिकोन व्यक्त केले जात आहेत. काही जणांकडून राग आणि अविश्वास दर्शविला जातो आहे, तर काही जण टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत करताहेत.  या सर्व प्रकाराची कोणत्या दिशेने वाटचाल होणार, याची चिंता व्यक्त करून ते म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता हा गुन्हा असल्याचा निकाल दिला… मानवी अधिकारांतर्गत आत्तापर्यंत अशा लोकांना निवडीची अनुमती होती, आपले जीवन कशा पद्धतीने जगावे, याचा अधिकार होता… त्यांच्याकडून या निर्णयावर मोठ्याप्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या.
टि्वटरवरील आपल्या संदेशात ते म्हणतात, २००९ मध्ये उच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांच्या बाजूने निकाल दिला होता. यावेळी व्यक्त करण्यात आलेला जल्लोष सर्व परिचित आहे. आता त्यांना आपली गुन्हेगार म्हणून गणना होण्याची भीती वाटत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर काहीजणांनी माध्यमांमधून प्रखर मतप्रदर्शन केले आहे.  या वृत्ताने अनेकजणांना धक्का बसला आहे. अशाप्रकारचा ‘गुन्हा’ झाला आहे, हे न्यायव्यवस्था कसे ठरवते किंवा तिला हे कसे समजते, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader