आपला नातू किंवा नातीच्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाला किंवा ‘अ‍ॅन्युअल डे’ला पाल्याच्या आई-वडिलांबरोबरच आजोबा किंवा आजीने उपस्थित राहणे यात काही नवीन नाही. प्रत्येक सर्वसामान्य घरातील आजी-आजोबा ते करतातच. पण नातीच्या ‘अ‍ॅन्युअल डे’ला हजेरी लावणारे आजोबा ‘सेलेब्रिटी’ आणि बॉलीवूडचे ‘शहेनशहा’, बिग ‘बी’ अर्थातच अमिताभ बच्चन असतील तर?
हो हे झाले आहे. आपले ‘सेलेब्रिटी’पण बाजूला ठेवून अमिताभ बच्चन यांनी अभिषेक व ऐश्वर्या यांच्यासह आपल्या नातीच्या आराध्याच्या शाळेत ‘अ‍ॅन्युअल डे’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमास आपली हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन यांनी आपला व्यवसाय आणि कुटंब हे नेहमीच वेगळे ठेवले आहे. कुटुंबासाठीही ते आपला वेळ जरूर देत असतात. नातीच्या अ‍ॅन्युअल डेसाठी ते ‘आजोबा’ म्हणूनच उपस्थित राहिले.
शाळेच्या ‘अ‍ॅन्युअल डे’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आराध्या पहिल्यांदाच ‘स्टेज’वर आपले सादरीकरण करणार होती. त्यामुळे अन्य मुलांच्या पालकांना असते, तशीच उत्सुकता आराध्याबाबत आपल्यालाही होती आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी आराध्याचे कौतूक करण्यासाठी उपस्थित राहिलो, असे अमिताभ बच्चन यांनी आपल्या ‘ब्लॉग’वर लिहिले आहे.
अन्य लहान मुलांबरोबर आराध्याला ‘स्टेज’वर कार्यक्रमात सहभागी झालेले पाहणे ही नक्कीच आनंदाची बाब होती. पडदा उघडल्यानंतर आराध्या व अन्य लहान मुलांचा कार्यक्रम पाहतानाचे क्षण हे सुखद असे होते. त्याचे शब्दात वर्णन करता येणे शक्य नाही, असेही बच्चन यांनी पुढे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा